पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु

shivrajya patra

सोलापूर : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये मतदार नोंदणीला प्रारंभ झाला आहे. मतदार नोंदणीची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०२५ आहे. या तारखेपूर्वी दोन्ही मतदार संघांकरिता पात्र व्यक्तींनी अर्ज करावेत असे अवाहन पदनिर्देशित अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी केलं आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे विभागाच्या पदवीधर व शिक्षक मतदार संध्याच्या निवडणूकांकरिता ०१ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नवीन मतदार याद्या (de-novo) तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यासाठी सोलापूर शहरामध्ये पदवीधर मतदार संघाकरिता २४ मतदान केंद्रे आणि शिक्षक मतदार संघाकरिता ५ मतदान केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. पदवीधर मतदार संघाकरिता फॉर्म नंबर १८ तर शिक्षक मतदार संघाकरिता फॉर्म १९ भरून द्यावयाचे आहे. 

नियुक्त करण्यांत आलेले पदनिर्देशित अधिकारी खालील प्रमाणे आहेत.

तहसीलदार उत्तर सोलापूर- निलेश पाटील, तहसीलदार कुळ फायदा- सैपन नदाफ, तहसीलदार सं. गा.यो - श्रीमती शिल्पा पाटील,  गट विकास अधिकारी उत्तर सोलापूर - राजाराम भोंग, नायब तहसीलदार - चंद्रकांत हेडगिरे,  नायब तहसीलदार - विठ्ठल जाधव, नायब तहसीलदार - रियाज कुरणे, नायब तहसीलदार -सुधाकर बंडगर, सहाय्यक आयुक्त सो. म. पा. श्रीमती मनीषा मगर, सहाय्यक आयुक्त सो. म. पा. - गिरीश पंडित, सहाय्यक गट विकास अधिकारी - बी. सी. पाटील

मतदार नोंदणी कार्यक्रमाचे टप्पे

सूचना प्रसिद्धी (मतदार नोंदणी अधिनियम, १९६० च्या कलम ३१ (३) नुसार जाहीर सूचना दि. ३० सप्टें २०२५ (मंगळवार) रोजी प्रसिद्ध केली जाईल.

वर्तमानपत्रातील नोटीसची प्रथम पुनर्प्रसिद्धी दि. १५ ऑक्टोबर २०२५ (बुधवार) रोजी वर्तमान पत्रात नोटीस पुन्हा प्रसिद्ध केली जाईल.

वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुनर्प्रसिद्धी दि. २५ ऑक्टोबर २०२५ (शनिवार) रोजी नोटीसीची दुसरी पुनर्प्रसिद्धी केली जाईल.

दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांकः प्रकरणानुसार नमुना १८ किवा १९ द्वारे दावे आणि हरकती स्वीकारण्याचा अंतिम दि.०६ नोव्हेंबर २०२५ (गुरुवार) आहे.

हस्तनिचिते तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई: दि. २० नोव्हेंबर २०२५ (गुरुवार) पर्यंत हस्तलिखिते तयार करणे आणि प्रारूप मतदार याद्याची छपाई करणे अपेक्षित आहे.

प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी प्रारूप मतदार याद्या दि. २५ नोव्हेंबर २०२५ (मंगळवार) रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी:- मतदार नोंदणी अधिनियम, १९६० च्या कलम १२ अंतर्गत दावे व हरकती दि. २५ नोव्हेंबर २०२५ (मंगळवार) ते दि. १० डिसेंबर २०२५ (बुधवार) या कालावधीत स्वीकारल्या जातील.

दावे व हरकती निकाली काढणे व पुरवणी यादी तयार करणे: दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करणे आणि तिची छपाई दि. २५ डिसेंबर २०२५ (गुरुवार) पर्यंत केली जाईल.

मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी: मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी दि ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार) रोजी होईल.

पात्र मतदारांनी जास्तीत जास्त फॉर्म भरून आपले नांव नोंदवावे. असे अवाहन मतदार यांना करण्यात येत आहे. https://mahaelection.gov.in वेबसाईटवर पदवीधर नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. तसेच दोन्ही मतदार संघासाठी ऑफलाईन फॉर्म तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर येथील निवडणूक शाखेत उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती पदनिर्देशित अधिकारी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ तथा तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली.

To Top