सोलापूर : 'सुंभ जळाला तरी, पिळ जात नाही' असं म्हणतात, याचा सार्थ प्रत्यय सोलापूर शहर पोलिसांनी केलेल्या तपासात पुढं आलाय. दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये 07 वर्षे शिक्षा भोगून 03 महिन्यांपूर्वीच ठाणे कारागृहातून बाहेर आलेल्या आंतरराज्य सराईत चोरट्यास जबरी चोरीच्या गुन्ह्यात गजाआड केलंय. मेरबानसिंग मायासींग दुधानी असं त्याचं नांव आहे. त्याने व त्याच्या अन्य साथीदारांनी चाकूच्या धाकाने केलेल्या जबरी चोरीबरोबरच 02 दुचाकी आणि 01 कार चोरीचे गुन्हे उघडकीस आले असल्याचे सांगण्यात आलंय.
फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत, गत सप्ताहात 11 ऑक्टोबर रोजी पहाटे अवंती हौसिंग सोसायटी येथील एका बिल्डींगमध्ये 04 शस्त्रधारी इसम ज्यामध्ये एकाकडे धारदार चाकू, बाकी तिघांकडे लोखंडी रॉड व लोखंडी कटावणी असे इसम यांनी बिल्डींगमधील सर्व फ्लॅटचे दरवाजाला बाहेरुन कड्या लावून तिसऱ्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये व दुसऱ्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये या घराचा दरवाजा जबरदस्तीने तोडून घरात घुसून घरातील इसमांना चाकूचा धाक दाखवुन जबरी चोरी केली म्हणून माहीती मिळाली होती.
त्यानुसार तात्काळ फौजदार चावडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन तक्रारदाराची तक्रार दाखल करण्यात आली. त्या ठिकाणी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे व सहा. पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांनी तात्काळ भेट देऊन फौजदार चावडी डी. बी. पथकास तो गुन्हा उघडकीस आणण्याबाबत योग्य त्या मार्गदर्शनपर सूचना दिल्या.
फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत व पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांचे मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाचे सपोनि क्षिरसागर व पथक यांनी तात्काळ त्या आरोपीतांचा शोध सुरु केला. तपासादरम्यान, सोलापूर शहरातून त्याच रात्री 01 मारुती सुझुकी कंपनीची अल्टो कार, तसेच 02 मोटारसायकल देखील चोरीस गेल्या आहेत. 
त्यावेळी ती कार व मोटारसायकल चोरी करणारे देखील जबरी चोरी करणारे चार इसमच असावेत, असा पोलीसांचा कयास होता, त्या आधारे तसेच सी.सी.टी. व्ही फुटेज व तांत्रीक माहितीच्या आधारे माहिती संकलित करुन सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार तपास करीत असताना, सपोनि/क्षिरसागर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, जबरी चोरी करणारे चार इसमांपैकी एक मेरबानसिंग असून तो विजापूर येथे राहत आहे, अशी माहिती प्राप्त झाली.
परंतु त्याचा पूर्ण पत्ता माहिती नव्हता, प्राप्त त्रोटक माहीतीच्या आधारे पोलीसांनी विजापूर राज्य कर्नाटक येथे जाऊन या इसमाचा दिवस-रात्र शोध घेतला असता, नमुद आरोपीत मेरबानसिंग मायासींग दुधानी (वय-34 वर्षे, रा. गुरुनानक कॉलनी, जर्मन फॅक्टरीजवळ विजापूर) हा 14 ऑक्टोबर रोजी विजापूर येथे मिळाला. त्यास ताब्यात घेऊन डी.बी. पथकाने त्याच्याकडे कसून तपास करुन त्याचा साथीदार आरोपीत हरेश विजयकुमार रामत्री (वय-32 वर्षे, रा. जुवेल विस्टा बिल्डींग, बदलापूर वेस्ट, ठाणे) याला गुरुवारी,16 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले.
या 02 आरोपींकडून चोरीच्या 02 मोटारसायकली,01 मारुती अलटो कार, तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी 01 सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असा एकूण 1, 52, 000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यात फौजदार चावडी पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे आणि सदर बझार पोलीस ठाण्याकडील उघडकीस आलेल्या गुन्ह्याचा समावेश आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेला चाकू, कटावणी, 02 लोखंडी रॉडदेखील हस्तगत करण्यात आलीय.
तसेच त्यांच्या अन्य 02 साथीदार आरोपीत यांची नावे निष्पन्न करण्यात आली असून या गुन्ह्याचा अधिक तपास सुरु आहे.
