(ओबीसी+भटके विमुक्त+अनुसूचित जाती+अनुसूचित जमाती+ धार्मिक अल्पसंख्यक= 85 टक्के बहुजन समाज)
ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी आणि आंबेडकरी बहुजन समाजाच्या नेत्यांनी एकत्र यावे, ही ओबीसी, आदिवासी आणि भटके विमुक्त आणि आंबेडकरी बहुजन समाजाची तीव्र इच्छा आहे. कारण बहुजन नेत्यांची विचारधारा ही सर्व सामान्य लोकांच्या हिताची आहे, समतेची आहे, ममतेची आहे आणि सर्व सामान्य लोकांच्या कल्याणाची आहे, म्हणून लोकांनी केलेल्या सूचनांचा नेत्यांनी विचार करावा.आपले मन बदलावे, आपलें अंतःकरण बदलावे. तुम्ही एकत्र येणारच नसाल तर अनेक अनेक शक्यता मावळतील, हे मात्र खरे !
सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीआई फुले ह्यांनी बहुजनांना जागृत करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शाळा काढून बहुजनांच्या मुला-मुलींना शिक्षणाची व्यवस्था केली, हे कार्य असामान्य होते. महात्मा फुले आणि सावित्रीआई फुले ह्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य बहुजनांनी आपल्या अंतःकरणात कोरून ठेवले पाहिजे. छत्रपती शाहू महाराज ह्यांनी महात्मा फुले ह्यांचा वारसा पुढे सुरु ठेऊन बहुजनांसाठी अतुलनीय कार्य करून ठेवले आहे.
विश्वरत्न ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे ऋण : भारतातील समस्त वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित, पीड़ित बहुजनांचे जीवन आपल्या समतावादी आणि मानवतावादी विचार आणि कार्य कर्तुत्वाने फुलविल्याबद्दल, प्रगत आणि उन्नत केल्याबद्दल समस्त बहुजन समाजच नव्हे तर ह्या देशातील प्रतेक नागरिकाने विश्वरत्न ड़ॉ बाबासाहेब आंबेडकरांचे कायम ऋणी असले पाहिजे. डॉ. बाबासाहेबांचे तत्वज्ञान हे केवळ भारतीय लोकांसाठीच नव्हे तर जगातील प्रत्येक नागरिकाच्या हिताचे आहे आणि त्यांच्या कल्याणाचे आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि मानवतावादी तत्वज्ञानाने, त्यांच्या संघर्षशील चळवळीने आणि त्यांच्या चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्वाने ह्या देशातील नागरिकांचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनच बदलून टाकले आहे. ह्या देशातील विषमतावादी आणि भेदभावपूर्ण समाज व्यवस्था बदलून ती समतावादी आणि मानवतावादी समाज व्यवस्था निर्माण करण्यात बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचे योगदान सर्वात जास्त आहे. ह्या देशातील समाजाची समता,बंधुता आणि न्यायावर आधारित पुनर्रचना करण्यात बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचे योगदान सर्वात जास्त आहे.
डॉ. बाबासाहेबांची सर्वोत्तम कृती म्हणजे भारताचे मानवतावादी संविधान होय. प्रत्येक नागरिकाला माणूस म्हणून मान्यता देणारे भारताचे संविधान हे जगातील सर्वात सुंदर संविधान आहे.
ह्या देशातील सामाजिक,आर्थिक आणि राजकीय व्यवस्था पूर्णपणे बदलायची असेल तर भारताच्या संविधानाची 100 टक्के अंमलबजावणी करणे नितांत गरजेचे आहे.भारताच्या संविधानाची 100 टक्के अंमलबजावणी करण्यासाठी भारताच्या संसदेत केंद्रस्थानी संविधानाच्या अस्सल समर्थकांची सत्ता असणे अत्यंत अत्यंत गरजेचे आहे.
भारतातील बहुजन समाज हाच संविधानाचा अस्सल आणि खरा समर्थक आहे आणि संविधान संरक्षक आहे, अन्यथा ह्या मानवतावादी संविधानाला विरोध करणारी काही गिधाडे अधून-मधून डोके वर काढते, हे बहुजन समाजाने समजून घेण्याची नितांत नितांत गरज आहे.
संविधान विषयक विवेचन करण्याचे कारण म्हणजे भारताच्या संविधानाची 100 टक्के अंमलबजावणी करण्यात येईल, प्रस्थापित राजकीय पक्ष आणि त्यांचे प्रस्थापित राजकिय नेते पूर्णपणे अपयशी ठरले आहे. संविधानाची अंमलबजावणी करण्याची येथील प्रस्थापित राजकीय पक्षांची इच्छाशक्तीच नाही. संविधान लागू होऊन 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. ह्या 75 वर्षात संविधानाची अंमलबजावणी जशी करायला हवी होती, तशी अजिबातच झालेली नाही, कारण येथील प्रस्थापित राजकीय पक्ष ते करू इच्छित नाहीत.
ते येथील सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय व्यवस्था जैसे थे ठेऊ इच्छितात. बहुजन लोकांचे अज्ञान आणि बहुजनांची गरीबी हेच त्यांचे राजकीय भांडवल आहे.अशा धर्मांध आणि जात्यंध्य लोकांनी येथील बहुजनांची विचार, मने आणि अंतःकरणे पूर्णपणे नासवून टाकले आहे.
भारताच्या संविधानाची 100 टक्के अंमलबजावणी करून येथील समाजाची समतेवर आधारित पुनर्रचना करायची असल्यास भारताच्या संविधानाचे अस्सल समर्थक आणि सरंक्षक असलेल्या राजकीय पक्षांनी भारत देशाची केंद्रातील राजकीय सत्ता हस्तगत करणे अत्यावश्यक आहे, पंरतु ते नजिकच्या भविष्यात अजिबात शक्य दिसत नाही. कारण संविधानाचे अस्सल समर्थक राजकीय पक्ष हे अत्यंत विस्कळीत,असंघटित, अव्यवस्थित, विभाजित आणि अस्ताव्यस्त आहेत.
त्यामध्ये विशेष करुन आंबेडकरवादी राजकीय पक्ष सर्वाधिक विस्कळीत आहेत, एक ना धड़ भाराभर चिंद्या झाले आहेत. ओबीसी,भटके विमुक्त आणि आदिवासी नेतृत्व करत असलेले राजकीय पक्ष ही अत्यंत विस्कळीत आणि अस्ताव्यस्त आहेत. ह्या राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये कुठलाही संवाद नाही, समन्वय नाही,सामंजस्य नाही आणि मैत्रीचे नातेही नाही.
राजकीय सत्ताच आपल्या उपेक्षित लोकांच्या समस्यांवरील एकमेव उपाय आहे. राजकीय सत्ताच येथील भेदभावपूर्ण सामाजिक,आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्था बदलू शकते. बहुजनांच्या सामाजिक चळवळीने, त्यांच्या सातत्यपूर्ण प्रबोधनाने येथील जनमानस बदलून टाकले आहे. परंतु बहुजनांच्या राजकीय चळवळी ह्या राजकीय सत्ता हस्तगत करण्यास सपशेल अपयशी ठरल्या आहेत. आपल्या समस्या जैसे थे ला आपल्या ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी आणि आंबेडकरवादी राजकीय चळवळी ही तितक्याच कारणीभूत आहेत. कारण बहुजन जनमानस बहुजनावादी चळवळीला राजकीय सत्ता सोपवण्याच्या मानसिकतेची आहे. परंतु आपल्या बहुजनवादी राजकीय चळवळीची राजकीय इच्छाशक्तीच नाही. बहुजनांचे राजकीय पक्ष आणि संघटना ह्या अहंकाराने प्रचंड फुगलेल्या आहेत.आणि हा अहंकार बहुजन समाजाला कायम गुलामीत ठेवेल.
आपले बहुजनवादी राजकीय नेते, त्यांचे राजकीय पक्ष, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे राजकीय विचार, त्यांची राजकीय विधाने ही अत्यंत प्रगल्भ असतात. बहुजनांच्या हिताची असतात. परंतु हे राजकीय नेते, कार्यकर्ते अत्यंत विस्कळीत आणि विभाजित आहेत. आपले आदर्श एकच असताना, आपले ध्येय आणि उद्धिष्ट एकच असताना, आपली विचारधारा एकच असताना,आपल्या बहुजन लोकांच्या समस्या समान असताना वेगळेपणा कशाला? पराकोटीचा अहंकार कशाला ?पराकोटीचा दुरावा कशाला? विसंवाद कशाला? संवादाचा अभाव कशाला?
आपण आपल्या ध्येयाप्रती अप्रामाणिक आहोत का? आपण उदासीन का आहोत? उपेक्षित, वंचित-कष्टी लोकांच्या दुःख-वेदना आणि अन्यायाहून मोठा आपला अहंकार आहे का? महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराजांच्या संघर्ष आणि कार्याहुन मोठा आपला अहंकार आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "शिका, बहुजन समाज शिकला." बाबासाहेब म्हणाले, संघर्ष करा, बहुजन समाज संघर्ष ही करू लागला." बाबासाहेब म्हणाले, संघटीत व्हा, इथे मात्र आपण बहुजन समाज चुकला."हे कुणीही नाकारणार नाही.
आपल्या राजकीय पक्षांनी,राजकीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी लोकांच्या सूचनांचा विचार करावा. होणाऱ्या टीकांवर चिंतन करावे, मंथन करावे, सयंम ठेऊन वागावे. आपले जे हितचिंतक असतात तेच सूचना करत असतात. शत्रु तर आपल्या अपयश, दैनावस्था आणि विस्कळीतपणावर अत्यंत खुश असतात.
ज्यांना सत्तेचे महत्व कळते ते भिन्नभिन्न राजकीय विचारांचे राजकीय पक्ष सत्तेसाठी एकत्र येतात. लहान-सहान राजकीय मतभेद गाडून टाकतात. पूर्वी केलेल्या चुका दुरुस्त करतात. कौशल्यपूर्ण राजकीय वाटाघाटी करून संघटीत होतात. कारण त्यांना चांगले माहित आहे की, राजकीय सत्ताच सर्व समस्यांवरील उपाय आहे. गुरुकिल्ली आहे.
राजकीय सत्ता म्हणजे देशाच्या खजिन्याची किल्लीच आपल्या हाती येते. आपल्याला हवे तसे निर्णय घेता येऊ शकतात. आपल्या लोकांना लहान-सहान कारणांसाठी रस्त्यावर उतरण्याची गरज नसते. आंदोलन करण्याची गरज नसते.महिला, मुली-मुले,तरुण, वृद्ध लोकांच्या हिताचे निर्णय सहज घेता येऊ शकतात.
गांधीवादी राजकीय विचारांचे राजकीय पक्ष सत्तेसाठी एकत्र येतात. उदाहरणार्थः काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी हे एकमेकांना भेटतात, चर्चा करतात, राजकीय आघाडी करतात, एकत्र निवडणुका लढवतात, जिंकतात आणि सत्तेत सहभागी होतात. तसेच समाजवादी विचारांचे राजकीय पक्ष एकत्र येतात. लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, चौटाला, देवेगौडा, नीतीश कुमार, पासवान इत्यादि नेते सत्तेसाठी अनेक वेळा एकत्र आले.
भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, कम्युनिस्ट पार्टी(माले),फॉरवर्ड ब्लॉक इत्यादि पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आणि येतात, एकत्र बसतात. हिंदुत्ववादी पक्ष जसे भाजप, शिवसेना ह्या पक्षांनी सत्तेसाठी अनेक वेळा एकत्र येऊन सत्ता हस्तगत केली. आणखी एक विशेष म्हणजे वरील राजकीय पक्षांचे नेते एकमेकांना भेटतात, बोलतात, चर्चा करतात.
उदाहरणार्थः शरद पवार, नरेंद्र मोदी, राहुल गांधी, सोनिया गांधी, कम्युनिस्ट नेते, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव हे एकमेकांना भेटले आणि भेटतात. एकमेकांच्या मुला-मुलींच्या लग्नात जातात. एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. मृत्यु झाल्यास शोक संदेश पाठवतात, दुःख व्यक्त करतात. त्यांची एकमेकांशी मैत्री ही असते. प्रसंगी टीका ही करतात. टीका करणे हे प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण आहे. टीका-टिप्पणी करणारे हे काही एकमेकांचे शत्रु नसतात.
आणखी एक अत्यंत महत्वाचे उदाहरण बघुयात...1978 ला समाजवादी, साम्यवादी आणि हिंदुत्ववादी राजकीय विचारधारेचे राजकीय पक्ष एकत्र येऊन जनता पक्ष नावाचा राजकिय पक्ष स्थापन करून केंद्रात सरकार स्थापन करतात. काँग्रेसला सत्ताच्युत करतात.1989 ला जनता दलाच्या नेतृत्वात समाजवादी, साम्यवादी आणि हिंदुत्ववादी विचारधारेचे राजकीय पक्ष एकत्र येऊन सत्ता हस्तगत करतात. एकमेकांचे कट्टर विरोधक देखील समाजाची गरज लक्षात घेऊन एकत्र येतात हे आपण बघतो.
भाजप आणि काँग्रेससारखे देशव्यापी राजकीय पक्ष देशातील समविचारी राजकीय पक्ष आणि समविचारी सामाजिक संघटनांना सोबत घेऊन आघाडी करतात,सत्ता हस्तगत करतात.मतांचे विभाजन होवू नये, समविचारी लोकांची मानसिकता तयार व्हावी, म्हणून वरील राजकीय पक्ष आपले राजकीय कौशल्य आणि परिपक्वता पणाला लावतात.
भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही राजकीय पक्ष धनाढ्य, श्रीमंत आणि भांडवलदारांचे राजकीय पक्ष आहेत. दोन्ही राजकीय पक्षांचे नेतृत्व हे तथाकथित उच्चवर्णीय लोकच करतात. त्यांच्या पक्षांमध्ये बहुजनांचा सहभाग केवळ त्यांचे पक्षवाढीसाठी असतो, तिथे निर्णय प्रक्रियेत बहुजन नसतो.
भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही बलाढ्य राजकीय पक्ष इतर समविचारी पक्षांशी युती करतात, आघाडी करतात तर मग बहुजनवादी, आंबेडकरवादी राजकीय पक्षांना राजकीय आघाडी का करता येत नाही. मैत्री का करता येत नाही. कुणी अडवले आहे? काय मजबूरी आहे? तुम्ही आपल्याच समविचारी राजकीय पक्षांशी युती करायला, मैत्री करायला तयार नसाल तर सत्ता प्राप्तीचे स्वप्न कसे साकारणार? बहुजनांच्या हिताचे निर्णय कसे घेणार? बहुजनांच्या अनगिनत समस्या कशा सोडवणार? होणारा अन्याय, होणारे अत्याचार कसे थांबणार?
वरील उदाहरणे देऊन विवेचन करण्याचे कारण म्हणजे आपले जे बहुजनवादी, आंबेडकरवादी राजकीय पक्ष आहेत, त्यामध्ये स्वाभिमानी बाणा ठेऊन स्वबळावर प्रत्येक निवडणुक लढणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये काही बहुजनांचे राजकीय पक्ष आहेत, ते नेहमीच अपयशी ठरतात. त्यांची नेहमीच अपमानजनक हार होते. ह्या पक्षांकडे आपले स्वतःचे प्रशिक्षित कार्यकर्ते आहेत. निष्ठावंत कार्यकर्ते आहेत तरीही पराभव होतो.
*हे राजकीय पक्ष एकत्र का येत नाहीत. महात्मा फुले शाहू महाराज आणि बाबासाहेबांनी घालून दिलेल्या आदर्शाहून मोठा आपला अहंकार आहे का? त्यांच्या संघर्षाहून मोठा आपला अहंकार आहे का?भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गाहून आपला अहंकार मोठा आहे का? असे अनेकानेक प्रश्न सर्व सामान्य बहुजनांच्या मनात निर्माण होतात. वरील सर्व राजकीय पक्ष फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित आहेत. ह्या सर्वच राजकीय संघटनांकड़े उत्तम वक्ते आहेत,उत्तम नियोजक आहेत, उत्तम संघटक आहेत आणि अत्यंत अभ्यासू नेते आहेत, परन्तु ह्या पक्षांची अत्यंत ताकदीची माणसे इतर बहुजनवादी, आंबेडकरवादी राजकीय पक्षांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना एकमेकांशी भेटताना, चर्चा करताना, कुठल्यातरी एखाद्या कार्यक्रमाच्या मंचावर एकत्र आलेले आम्ही बघितले नाही.
नेते एकमेकांना भेटल्याचे, चर्चा केल्याचे, कुठल्यातरी सामाजिक किवा सांस्कृतिक समारोहात एकत्र सहभागी झाल्याचे आम्हाला तरी आठवत नाही. वरील सर्व राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना भारतात समता, बंधुता आणि न्यायावर आधारित समाज निर्माण करायचे आहे. मग विभक्त राहून तसे करणे कसे शक्य होईल? असंघटितपणामुळे सर्व शक्यता मावळतात.
तत्वज्ञान किती ही उदात्त असेल, कल्याणकारी असेल, मानवतावादी असेल, समतावादी असेल, विज्ञानवादी असेल, विवेकवादी असेल,तर्कशील असेल, परंतु त्या तत्वज्ञानाचे प्रचारक, प्रसारक, प्रबोधक आणि विस्तारक हे संघटीत नसतील, विभागलेले असतील, दुभंगलेले असतील, अहंकाराने फुगलेले असतील, आपल्या ध्येयापेक्षा आपला स्वभाव मोठा समजणारे असतील तर ते उदात्त तत्वज्ञान कुचकामी ठरेल.
आपल्या ह्या अत्यंत अभ्यासू आणि जिद्दी नेत्यांनी एकमेकांना भेटायला,चर्चा करायला, आघाडी करायला कुणी रोखले आहे. एकीकडे विषमतावादी शक्ति बळकट होताना, बहुजन समाजाचे अनगिनत प्रश्न असताना हे नेते एकत्र का येत नसावे? असे प्रश्न बहुजन समाजातील लोकांना पडतात. प्रचंड नेतृत्व क्षमता असलेली ही माणसे एकत्र होत नाहीत, म्हणून समाजात प्रचंड प्रमाणात अस्वस्थता आहे, दुःख आहे. समाजातील अस्वस्थ लोक ह्या नेत्यांवर जहरी टीका देखील करतात. त्या सर्व टीका ह्या नेत्यांच्या प्रेमापोटी असतात. परंतु नेते ते समजून घेतील तेव्हा.
ह्या बहुजनवादी आंबेडकरवादी नेत्यांमध्ये पराकोटीचा दुरावा असण्याचे काय कारण असावे?त्यांच्यामध्ये मैत्री न होण्याचे काय कारण असावे? ते एकमेकांची विचारपुस का करत नसावे? असे अनेक प्रश्न बहुजन समाजातील लोकांना पडतात.
हे बहुजनवादी,ओबीसी, आम्बेडकरवादी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते एकत्र येत नाहीत, म्हणून जगाचा कोणताही व्यवहार थांबणार नाही.परन्तु अनेक शक्यतांना लगाम लागेल. सर्व शक्यता मावळतील. समताधिष्टित समाज निर्माण होण्याची प्रक्रिया मात्र थांबेल. सामाजिक आणि आर्थिक न्याय शक्य होणार नाही. अस्सल संविधान समर्थकांची शक्ती मात्र कमी होईल. संविधान विरोधकांची शक्ति वाढेल. चिमुटभर विषमतावादी शक्ति अत्यंत बळकट होताना दिसेल.
मानवतावादी माणसे विभागलेले,विस्कळीत झालेले, अस्ताव्यस्त झालेले बघून विषमतावादी लोकांना आनंद होतो. ओबीसी,भटके विमुक्त, अनुसूचित जाती, जमाती आणि अल्पसंख्यक लोकांच्या चळवळी क्षीण होतील. अन्याय होत राहिल. अत्याचार वाढत जातील. सामान्य बहुजन लोक निराशा होतील.
बहुजनवादी,ओबीसी, आम्बेडकरवादी नेते आणि त्यांचे राजकीय पक्ष ह्यांची आघाडी होत नसल्याने होणारे नुकसान बघा, संविधान समर्थक शक्ती विभाजित असल्याचे नुकसान बघा,त्यांच्या मध्ये पराकोटीचा दुरावा असल्याचे नुकसान बघा:
वरील सर्व समस्यांना, त्रासांना, अन्यायांना, अत्याचारांना बहुजन समाजाला सामोरे जावे लागत आहे. त्याचे कारण म्हणजे बहुजन समाजासाठी कार्य करणारे राजकीय पक्ष सत्तेपासून कोसो दूर आहेत. कोसो दूर असण्याचे कारण म्हणजे असंघटित अवस्था... ! प्रस्थापित राजकीय पक्ष एनडीए आणि इंडिया आघाडी करून सत्ता हस्तगत करतात. बहुजनांचे राजकीय पक्ष मात्र स्वबळावर निवडणुकांना सामोरे जातात. आजचा काळ युत्या आणि आघाड्या करून सत्ता प्राप्त करण्याचा आहे. बहुजनांच्या राजकीय पक्षांना अपमानजनक पराभव पत्कारावा लागतो.
बहुजनांच्या नेत्यांची मने इतकी दुरावलेली आहेत की,ते इतरांचा विचारच करत नाही.आपल्या नेत्यांना आपला अहंकार महत्वाचा वाटतो. आपल्या उपेक्षित समाजाचे दुःख महत्वाचे वाटत नाही. कारण नेते हे सुरक्षित असतात. आपण ज्या समाजाच्या भरोश्यावर राजकारण करतो, तो समाज मात्र असुरक्षित असतो.

