वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केला निर्धार
सोलापूर : भारत गारमेंटच्या सर्व सभासदांनी व्यक्त केलेल्या विश्वासाला पात्र राहून नव्याने निवडून आलेल्या सर्व संचालकांनी प्रामाणिक हेतू ठेऊन लवकरात लवकर भारत गारमेंटचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही अध्यक्ष शफी इनामदार यांनी दिली.
भारत गारमेंटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सोलापूर श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामप्पा चिवडशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शफी इनामदार बोलत होते.
अल्पसंख्यांक सभासद असलेली दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी गावातील भारत गारमेंटच्या प्रकल्प स्थळावर अत्याधुनिक अशा पध्दतीची यंत्रणा आणि सोई सुविधा उपलब्ध असलेली भारत सहकारी गारमेंट आगामी काळात अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. यापूर्वी काही उद्योजकांना हा प्रकल्प चालवण्यास देण्यात आला होता. त्यांच्याकडून योग्य पध्दतीने प्रकल्प चालवला गेला नाही, म्हणून यापुढे नव्याने निवडून आलेल्या सर्व संचालकांकडूनच हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे, असेही अध्यक्ष शफी इनामदार यांनी सांगितले. 
सभासदांनी विश्वास ठेवून संचालकांना अविरोध निवडून दिल्याबद्दलही त्यांनी सर्व सभासदांचे आभार व्यक्त केले. प्रकल्प सुरू करण्यासाठी अनेक अडचणी आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था अडचणीमध्ये आहेत, मात्र भारत सहकारी गारमेंटचा हा प्रकल्प सुरूवातीपासूनच आंतरराष्ट्रीय दर्जाचा निर्माण करण्याचा प्रयत्न सर्व संचालकांनी प्रामाणिकपणे केला. त्यामुळेच भारत गारमेंटच्या प्रकल्पाबाबत सहकार क्षेत्रात चांगल्या प्रतिक्रिया असतात. त्यामुळेच हा प्रकल्प लवकरच सुरू करणार असल्याचे अध्यक्ष शफी इनामदार यांनी सांगितले.
प्रारंभी ज्येष्ठ संचालक मोहियोद्दीन मनियार यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रभारी व्यवस्थापक शकील पिरजादे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेपुढील सर्व विषयांचे वाचन केले. त्यावेळी उपस्थितीत सभासदांनी प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा, अशी सूचना मांडली. त्याला अध्यक्ष शफी इनामदार यांनी प्रकल्प लवकरच सुरू होईल, असे आश्वासन दिले. 
त्यानंतर सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. भारत गारमेंटचे उपाध्यक्ष अ. गनी पठाण यांनी सभेचे सहसंचालन केले. संस्थेच्या संचालकांची अविरोध निवड झाल्याबद्दल सभासदांच्या वतीने नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.
या सर्वसाधारण सभेला मोठ्याप्रमाणात सभासदांची उपस्थिती होती. शेवटी ज्येष्ठ संचालक मुनाफभाई चौधरी यांनी आभार व्यक्त करून सभेची सांगता केली.
