सोलापूर : फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ नागेश शिवाजी महानुर (वय ३४ वर्षे) याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करून सोमवारी त्याची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहाकडे करण्यात आली.
पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश जारी केले. उत्तर कसब्यातील सळई मारुती जवळील रहिवासी सुरज उर्फ नागेश महानुर याच्याविरुद्ध घातक शस्त्राने दुखापत, जबरी चोरी, खंडणीची मागणी यासारखे 
06 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक त्याच्याविरुद्ध बोलण्यास पुढे येत नाहीत, असंही पोलिसांचे म्हणणे आहे.
त्याच्याविरुद्ध यापूर्वी एमपीडीए कायद्यान्वये दोन वेळा कारवाई करण्यात आली होती, मात्र त्याच्या वर्तणुकीत कोणताही बदल न झाल्याने पुन्हा एम पी डी ए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असल्याचे माहिती कक्षातून एका प्रसिद्धीपत्रकान्वये सांगण्यात आले.
