शेतकऱ्यांसाठी 50 टक्के अनुदानावर शेळीपालन एक चांगली योजना : पशुधन परीक्षक कदम

shivrajya patra

दक्षिण सोलापूर : शेतकऱ्यांसाठी 50 टक्के अनुदानावर शेळीपालन एक चांगली योजना आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी महापोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे, असं प्रतिपादन पशुधन परीक्षक धर्मराज कदम यांनी केले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कासेगांव व पशुवैद्यकीय दवाखाना, उळे यांच्या सहकार्याने पशु चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात उपस्थित शेतकरी-पशुपालकांना मार्गदर्शन करताना पशुधन परीक्षक कदम बोलत होते.

या पशुवैद्यकीय शिबिरामध्ये पशुधन परीक्षक धर्मराज कदम यांनी केंद्र शासनाबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनेची माहिती दिली. 

या शिबीरात लाळ खुरकूत,  घटसर्प, रोग प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन केले. त्यामध्ये जवळपास 300 गाय, म्हैस, शेळी वर्गाचे लसीकरण करण्यात आले. त्याचबरोबर वांझ जनावरांची मोफत गर्भ तपासणी करून जंतुनाशके औषध देण्यात आली.

शासनाच्या योजना राबविण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचं सरपंच यशपाल वाडकर यांनी सांगितले. 

हनुमंत जाधव यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करून शिबीराचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय पवार, पशुधन विकास अधिकारी व्ही. व्ही. भडंगे उपस्थित होते. 

यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे, संभाजी चौगुले, जालिंदर गायकवाड, राम पाटोळे, श्याम इटुकडे, महालिंग गायकवाड, सरकार पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल जाधव यांनी केले तर  ग्रामपंचायत अधिकारी कलाल यांनी सर्व उपस्थितांचं आभार व्यक्त केले.

To Top