सोलापूर : ऑफग्रिड एनर्जी लॅब्स, दिल्ली हे लंडन येथे पेटंट प्राप्त आपल्या ZincGel बॅटरीचे उत्पादन सुरू करणार असल्याची माहिती कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस संजीव कुसूरकर ह्यांनी दिली. डॉ.तेजस,डॉ. ब्रिंदन तुलचान, ऋषी श्रीवास्तव आणि अंकुर अग्रवाल ह्यांनी ह्या कंपनीची स्थापना केली आहे.
अर्चियन केमिकल इंडस्ट्रीज आणि अंकुर कॅपिटल ह्यांनी ऑफग्रिड कंपनीस उत्पादन सुरू करण्यासाठी 130 कोटीचे भांडवल पुरवले आहे.
तेजस हा होटगी रोड सहकारी औद्योगिक वसाहतीचे शिल्पकार कै. बाबा कुसूरकर ह्यांचा नातू असून बडोदा बँकेचे निवृत्त अधिकारी संजीव ह्यांचा मुलगा आहे.
तेजसचे शालेय शिक्षण सोलापूरच्या ज्ञान प्रबोधिनीत झाले असून संगमेश्वर कॉलेजमधून बारावी उत्तीर्ण झाल्यावर त्याने नाशिक, नगर येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे जुलै 2015 मध्ये त्याने आयआयटी कानपूर येथून बायो इंजिनियरिंग मध्ये डॉक्टरेट मिळवली. डॉ. तेजस आणि डॉ. ब्रिंदन तुलचन ह्यांनी तेथे सहा वर्षे संशोधन करून दिल्लीत आपल्या स्टार्ट अपची सुरुवात केली.
पुढील वर्षी कंपनी बॅटरी उत्पादन सुरु करणार असून पर्यावरणपूरक आणि स्वच्छ ऊर्जा तत्वावर आधारित ह्या बॅटरी असतील.भावी काळात भारतात मोठ्या प्रमाणात ZincGel बॅटरी उत्पादन सुरू करण्याचाही हेतू आहे.
सोलापूरचा सुपुत्र लंडन येथे स्वतःचा उद्योग स्थापन करतो आहे ह्यासाठी तेजसचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
