...समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना मदत करावी : ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे

shivrajya patra

"शाक्य" सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सोलापूर संस्थेचा तृतिय वर्धापनदिन साजरा

सोलापूर : संस्था कोणतीही असो, त्या-त्या संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक आणि सुधारणेचे कार्य अपेक्षित असते. कार्यक्रमात, शाल श्रीफळ, बुके देण्यासाठी होणारा वायफळ खर्च करण्यापेक्षा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना मदत करावी, असं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी केले.

महाराष्ट्र पोलीस दलातून सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचं समाजाप्रति वाहून घेतलेलं तसेच जिल्हानिहाय शाखाच्या स्वरूपात राज्यव्यापी संघटन अशी ओळख धारण करीत असलेल्या "शाक्य" सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सोलापूर संस्थेचा तृतीय वर्धापनदिन सोमवारी, 08 सप्टेंबर रोजी जुळे सोलापुरातील धनश्री मल्टिपर्पज हॉलमध्ये उत्साहात पार पडला. 

या कार्यक्रमाला अमृत बेडगेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मंगल बेडगेकर, पांडुरंग तुळशीराम मोरे, अण्णाराव वाघमारे, आयु. परकाळे, रमेश सरवदे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.  

"शाक्य" सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. अंगध ना. मुके यांनी अपरिहार्य कारणास्तव या सुंदर सोहळ्यास थोडा उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून प्रास्ताविक करताना, त्यांनी संस्थेच्या तीन वर्षाची वाटचाल आणि कार्याला ओझरता उजाळा दिला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आनंद मसलखांब यांनी केले. यादरम्यान अशोककुमार दिलपाक यांनी वधू-वर सूचक मंडळाचे महत्व विशद करून वधू-वर सूचक परिचय पत्रिका सर्वांना वाटून त्यामध्ये माहिती भरून पाठवण्यास कळविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे होते.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ साहित्यिक वाघमारे पुढं म्हणाले, महिलांनी पुढाकार घेऊन बचत गट स्थापन करून आर्थिक प्रगती  करावी, कारण जर स्त्रियांना आर्थिक महत्व कळले की, खऱ्या अर्थाने प्रथम कुटुंब सुखी संपन्न बनते.त्यासाठी पुरुषांनी या स्त्रियांना आर्थिक बचत करण्यासाठी प्रेरित करावे.

तसेच समाजात अनेक गरीब गरजंवंत विद्यार्थी आहेत, त्यांना आपल्या संस्थेकडून काही शालेय साहित्य पुरवावं, आवाहनही आपल्या मार्गदर्शनपर भाषणात वाघमारे यांनी केले.

शेवटी संस्थेच्या सर्व मान्यवर व महिला यांचा गुलाब पुष्प व पंचशील उपरणे देऊन छान सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवर यांनाही पण पंचशील उपरणे, संस्थेचे बोधचिन्ह व बुके देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी "शाक्य" सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. अंगध मुके यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.

*** चौकट 

संस्थेला कार्यालयासाठी फॉरेस्टमधील जागा घ्या : परकाळे सर 

परकाळे सर यांनी नेहमीच्या शैलीत, समाजाची आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती करण्याच्या दृष्टीने संस्थेचे कार्य असावे, अशी अपेक्षा व्यक्त करून या संस्थेने सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक या बाबींकडे लक्ष द्यावं, असं आवाहन केले. संस्थेला कार्यालय असावे, आमची फॉरेस्ट येथे जागा आहे. ती जागा देणेस तयार आहोत, तेव्हा त्याचा विचार व्हावा, हेही सांगायला ते विसरले नाहीत.

*** चौकट 

शुभेच्छा देण्यास शब्द अपुरे पडतात : पी. टी. मोरे 

शाक्य संघटन खूप छान संघटन आहे. आपल्या संस्थेच्या वतीने उत्तम सामाजिक प्रबोधन होत आहे, हे आम्ही यापूर्वी ऐकले आहे. आपण सेवानिवृत्तीनंतर हे संघटन निर्माण करून सामाजिक सेवेची बांधिलकी जपत आहात, हे प्रत्यक्ष अनुभवतोय.

सेवेत असताना आपणास आपल्या संसाराकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नव्हता, पण सेवानिवृत्तीनंतर सुद्धा आपण आपली समाजाप्रती असलेली भावना कृतीत उतरावलात. आपणास शुभेच्छा देण्यास शब्द अपुरे पडतात, असं पी. टी. मोरे यांनी म्हटले.

*** चौकट 

सेवानिवृत्त पोलिस अधिकारी करतात सामाजिक कार्य : अण्णाराव वाघमारे 

आपला आजवर पोलिसांशी फारसा संपर्क आलेला नाही, तरी पण मला पोलिस खात्याविषयी खूप आदर आहे, असं अण्णाराव वाघमारे यांनी असं सांगून सेवानिवृत्त पोलिस इतकं छान संघटन करून सामाजिक कार्य करतात. हे आम्ही आज रोजी प्रत्यक्ष अनुभवतोय, असं म्हटले.

आपण आम्हास सन्मानाने बोलावून आपल्या संस्थेचे बोधचिन्ह देऊन सत्कार केलात,याबद्दल आम्ही आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सभासद यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्वांना गोड-गोड शुभेच्छा देतो, या शब्दात आयु. अण्णाराव वाघमारे यांनी शुभेच्छा दिल्या.

*** चौकट 

... या निमित्ताने यांचा झाला सत्कार !

याशिवाय नव्याने संस्थेत दाखल झालेले शिवपुत्र घटकांबळे व त्यांची पत्नी सुनंदा या उभयतांना आमंत्रित करण्यात आलं होते, मात्र शिवपुत्र घटकांबळे हे एकटेच कार्यक्रमास उपस्थित राहिल्याने, त्यांना तृतीय वर्धापनदिन बोधचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नागेश गायकवाड यांचाही सपत्निक सत्कार करण्यात आला. विचार मंचावरील सर्व मान्यवरांचा पंचशील उपरणे, पुष्पगुच्छ व संस्थेचे बोधचिन्ह देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर शांताराम वाघमारे यांनी सेवानिवृत्तीनंतर  MSW ही शैक्षणिक पदवी प्राप्त केल्याने व त्यांची विधी सहायक म्हणून निवड झाल्याने त्याचा बोधचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आयु. डॉ. अंगध मुके यांना त्यांनी लिहिलेल्या "निवडुंगाच्या गोड फळं" या आत्मचरित्रासाठी मानद  PHD ही पदवी मिळाल्याने त्यांचाही संस्थेचे बोधचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

*** चौकट 

मुला-मुलींच्या विवाहासंबंधीच्या समस्या काही अंशी आपणही सोडवू शकतो : अशोककुमार दिलपाक

29, ऑगस्ट रोजी पुण्यातील ताडीवाला रोड नालंदा बुद्ध विहार येथे झालेल्या मिटिंगमध्ये अशोककुमार दिलपाक यांनी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच बौद्ध समाजातील अनेक  अनेक मुले-मुली शिक्षणाने उच्चशिक्षित झालेली आहेत. त्यांच्या विवाहाच्या समस्या वाढलेल्या आहेत. त्याकरिता काही कमी प्रमाणात आपण त्या सोडवू शकतो, असा विचार मांडला होता.

त्याप्रमाणे "शाक्य संघ," सोलापूर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी सोलापूर, "शाक्य संघ‌‌‌," प्रज्ञासूर्य सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कर्मचारी बहुदेशी सामाजिक संस्था अमरावती, "शाक्य संघ," शौर्य विजयस्तंभ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशी सामाजिक संस्था पुणे आणि "शाक्य संघ‌‌‌," जय भीम सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी सामाजिक संस्था, दौंड असे एकत्र येऊन सर्वांनी मान्यता दिली. 

त्याप्रमाणे "शाक्य" संघमित्रा वधु सुचक (मोफत) सोलापूर, "शाक्य संघ‌‌‌," राजगीर वधू वर सूचक (मोफत) अमरावती, "शाक्य संघ," नालंदा वधू वर सूचक (मोफत) पुणे आणि "शाक्य संघ‌‌‌,"माता रमाई वधू वर सूचक (मोफत) दौंड, जिल्हा पुणे असे मोफत वधू वर सूचक चालू करण्याचे ठरले.

त्याप्रमाणे हे सामाजिक काम करण्याकरता वरील जिल्हे स्वखुशीने तयार झाले. प्रत्येक जिल्ह्यात दोन ऍडमिन तयार करण्यात आले. ते ऍडमिन त्यांच्या जिल्ह्यात सोमवार ते शनिवार ठराविक नमुन्यात कॉम्प्युटर केलेला बायोडाटा एकत्रित करावे. तसेच सदरचा बायोडाटा कॉम्प्युटरवरच तयार करून घेण्याचे ठरले. सोमवार ते शनिवार एकत्रित झालेले बायोडाटे हे दर रविवारी दुपारी 12-00 ते नंतर "शाक्य संघ," वधू वर सूचक महाराष्ट्र ग्रुपवर टाकण्याचे निश्चित करण्यात आले.  ग्रुप मोफत आहे तसेच सदरचा ग्रुप महाराष्ट्राचा फक्त ओन्ली एडमिन आहे.

अशा पद्धतीने सामाजिक काम करण्याचे ठरले आहे. त्यातून भविष्यात नक्कीच महाराष्ट्रातील मुलांचे व मुलींचे विवाह जमतील, वरील प्राथमिक स्वरूपाचे काम सुरू करण्याचे ठरले, अशी माहिती "शाक्य ,"सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर तृतिय वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात, अशोककुमार दिलपाक यांनी वधू-वर सूचक मंडळाचे महत्व विशद करून वधू-वर सूचक परिचय पत्रिका सर्वांना वाटून त्यामध्ये माहिती भरून पाठवण्यास कळविण्यामागची पार्श्वभूमी होती.

To Top