शिक्षक हा समाज आणि राष्ट्राचा खरा शिल्पकार असतो : प्राचार्य डॉ. आर. पी. बुवा

shivrajya patra


सोलापूर : शिक्षकांच्या समाजातील भूमिकेवर प्रकाश टाकत, “शिक्षक हा समाज आणि राष्ट्राचा खरा शिल्पकार असतो” असं प्रतिपादन संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. बुवा यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ तर्फे प्रतिष्ठेचा 'नेशन बिल्डर अवॉर्ड 2025' हा सोहळा गुरुवारी, 25 सप्टेंबर रोजी सोलापूर येथील मेसन्स हॉल, रंगभवनाजवळ, येथे अत्यंत उत्साहात पार पडला. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच आदर्श शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला. या गौरव सोहळ्यास प्राचार्य डॉ. आर. पी. बुवा प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

आपल्या कर्तृत्वाने विद्यार्थ्यांचे जीवन घडविणारे आणि समाजाला दिशा देणारे हे शिक्षक खऱ्या अर्थाने “नेशन बिल्डर” ठरले. त्यांना रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्यावतीने स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

सचिव रोटे. युगंधर जिंदे यांनी स्वागतपर भाषण केले. लिटरेसी डायरेक्टर रोटे. मधुरा वडापुरकर, रोटे. राजन अन्यपनवार व रोटे. दीपक आहुजा यांनी कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन केले. रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचे अध्यक्ष रोटे. संतोष सपकाळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचे “नेशन बिल्डर अवॉर्ड” हे शिक्षक सन्मान सोहळे दरवर्षी घेतले जातात. या माध्यमातून समाजातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा रोटरीचा मानस असतो. त्याचाच एक भाग म्हणून बर्नाड क्लीमेंट अँथनी (हिंदुस्तानी कॉन्व्हेंट स्कूल-सोलापूर), रविराज शिवानंद खडखडे (जिल्हा परिषद शाळा कुमठे-अक्कलकोट), वसुंधरा नितीन कुलकर्णी (जिल्हा परिषद शाळा-तोगराळी), नेहा अजिंक्य विपत (लिटिल फ्लावर हायस्कूल) आणि शिल्पा महादेव पाटील (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल) या शिक्षक-शिक्षिकांना “नेशन बिल्डर अवॉर्ड” गौरविण्यात आले.

या समारंभाला अनेक रोटेरियन, अ‍ॅन्स, अ‍ॅनेट्स तसेच मान्यवर नागरिकांची उपस्थिती लाभली. उपस्थित सर्व मान्यवरांनी सन्मानित शिक्षकांचे अभिनंदन केलं तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा अविस्मरणीय सोहळा सर्वार्थाने यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोटे. डॉ. विष्णू सुशीला गोपाळसा रंगरेज यांनी केले. शिक्षकांचा परिचय वंदना कोपकर, आसावरी सराफ, आरती गांधी, दीपक आर्वे, जान्हवी माखीजा यांनी करून दिला तर दीपक आहुजा यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले. 

To Top