तत्कालीन पोलीस आयुक्त अशोक कामठेंना मारहाण अन् शासकीय कामात अडथळ्याचा आरोप
सोलापूर : सोलापूर शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त अशोक कामठे यांना हाताने मारहाण करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप न्यायालयात सिध्द न झाल्याने जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जे. कटारिया यांनी माजी आमदार रविकांत शंकरेप्पा पाटील यांच्यासह 07 जणांची निर्दोष मुक्तता केली. हा खटला जवळपास 18 वर्षांहून अधिक काळ चालला.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, तो दिवस होता ... 16 ऑगस्ट, 2007 रोजीचा ! निमित्त होतं तत्कालीन आमदार रविकांत शंकरेप्पा पाटील यांच्या वाढदिवसाचं ... स्थळ : सात रस्ता येथील आमदार पाटील यांच्या बंगल्याचं प्रांगण ... वेळ : रात्री 12.00 वा. च्या सुमारास फटाके आतषबाजी अन् जल्लोष शिगेला पोहोचलेला... त्यात पेट्रोलिंग करीत असलेल्या पोलिसांची इन्ट्री ... !
त्यामुळे पेट्रोलिंग करणारे सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रकाश भोसले, पोलीस निरिक्षक श्रीरंग कुलकर्णी, पोलीस उपनिरिक्षक बाबासाहेब कुलकर्णी त्याठिकाणी आले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार रात्री फटाके वाजवू नका, असे सांगत होते.
त्यावेळी वायरलेसवरुन संदेश प्राप्त झाल्याने पोलीस निरिक्षक शहाजी नरसुडे, पोलीस उपआयुक्त लक्ष्मण भोसले व पोलीस आयुक्त अशोक कामठे त्या ठिकाणी आले. त्यानंतर रविकांत पाटील यांनी, मी आमदार आहे, ते माझे समर्थक कार्यकर्ते आहेत, त्यांना फटाके वाजवू द्या, ताब्यात घेऊ नका, असे म्हणून हरकत घेऊ लागले.
त्यावेळी पोलीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना, रविकांत पाटील यांनी पोलीस आयुक्त अशोक कामठे यांच्या अंगावर जाऊन धक्काबुक्की केली व जिवे ठार मारण्याची धमकी देऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना मज्जाव करुन, शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशा आशयाची फिर्याद सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल केली.
त्यानुसार आरोपी आमदार रविकांत पाटील, उदय शंकर पाटील, गणेश कटारे, राम खांडेकर, श्रीशैल खंदारे, मल्लिनाथ निरगुडे, सदाशिव मस्के, कल्लप्पा वाघमारे, जब्बार शेख, बाळासाहेब घुले यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस निरिक्षक शहाजी नरसुडे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यामध्ये सरकारतर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. खटल्याचे अंतिम युक्तीवादावेळी आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे यांनी घटनेवेळी पोलीसांनी बेकायदेशीरपणे रविकांत पाटील यांच्या घरामध्ये मध्यरात्री प्रवेश करुन, गोंधळ घालून त्यांना धक्काबुक्की करुन जखमी केले.
ते आमदार असल्याने पोलीसांच्या बेकायदेशीर कारवाईमुळे कारवाई करतील, म्हणून खोट्या आशयाची फिर्याद दिल्याचे सांगून लावण्यात आलेल्या कलमांची गृहितके शाबित करण्यात आली नसल्याचे सांगून त्या पृष्ठर्थ्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले. ते ग्राहय धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जे. कटारिया यांनी आरोपी रविकांत पाटील (उ.व. 68 वर्षे, रा. सोरेगांव, ता. उत्तर सोलापूर) यांच्यासह इतर 07 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात केली.
यात आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. राजकुमार मात्रे, ॲड. व्ही. डी. फताटे (स्व.), ॲड. विक्रांत फताटे यांनी तर सरकारतर्फे ॲड. प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले.
