'त्या' आदेशाविरूध्द दाखल दावा न्यायालयानं फेटाळला; या उत्सवात शहर-जिल्ह्यात बंदी कायम

shivrajya patra

सोलापूर : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि सोलापूर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी गणेशोत्सव कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरण्याचा बंदी आदेश जारी केला होता. या निर्णयाविरूध्द न्यायालयात दाखल दाव्यात सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद विचारात घेऊन, न्यायालयानं उभयतांनी या उत्सव काळात डॉल्बी सिस्टीम वापरण्याचा बंदीचा आदेश कायम ठेवला.

पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी त्यांच्या अधिकार कक्षेत, 01 सप्टेंबर रोजीपासून ते 07 सप्टेंबर रोजीच्या 24.00 वा. पर्यंत पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर हद्दीमध्ये, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि ईद-ए-मिलाद कमिटी यांच्याकडून आयोजित मिरवणुकांमध्ये, डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यास 01 सप्टेंबर रोजीच्या आदेशान्वये, प्रतिबंध आदेश निर्गमित करून त्याबाबत जाहीर प्रसिध्दी केलेली होती. 

त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देखील संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात नमूद कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरास बंदी आदेश जारी केलेले आहेत.

या बंदी आदेशाविरुध्द अॅड. योगेश पवार यांनी 5 वे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, तथा अति. मुख्य न्यायाधीश यांच्या न्यायालयात नियमित दिवाणी दावा क्रमांक 986/2025 नुसार दावा दाखल केलेला होता. या दाव्याच्या अनुषंगाने, पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनानुसार गुरुवारी, 04 सप्टेंबर रोजी सोलापूर पोलीस आयुक्तालय यांच्याकडून सविस्तर लेखी म्हणणे सादर केले.

त्यावर सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी डॉल्बी सिस्टीम बंदीबाबत निर्गमित आदेश अचूक व संयुक्तीक असल्याबाबत न्यायालयात परीपूर्ण व जोरदार युक्तीवाद केला. 

न्यायालयाने सरकार पक्षाचे म्हणणे आणि युक्तीवाद ग्राह्य धरून उभयतांकडून डॉल्बी सिस्टीमवर घालण्यात आलेली बंदी कायम ठेवली.

To Top