... प्रसंगी परिवहन मंत्र्यांच्या दालनासमोर करू आंदोलन : प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार

shivrajya patra

पत्रकार सुरक्षा समितीच्या लाक्षणिक उपोषणात पत्रकारांच्या वाहनाला टोलमध्ये सवलतीची मागणी 

सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांना टोलमधून सुट देण्याच्या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी, दिवसभर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या प्रश्नावर राज्य सरकार उदासीन दिसत आहे. या प्रश्नावर राज्याच्या परिवहन मंत्र्यांच्या दालनासमोर निर्णायक क्षणी आंदोलन करण्याचा इशारा यशवंत पवार यांनी दिला.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिल्या जात असलेल्या पत्रकारितेचा आधार असलेला पत्रकार ऊन, वारा-पाऊस अंगावर झेलत असतो. पत्रकारांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासनाच्या वार्ता संकलनासाठी जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातून जिल्ह्याच्या ठिकाणी चारचाकी वाहनातून प्रवास करावा लागतो. 

जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा उद्योग कार्यालय तसेच विविध महामंडळाचे कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी असतात. 

जिल्ह्यातील आमदार-खासदार, कॅबिनेटमंत्री राज्यमंत्री यांचे दौरे नियोजन बैठका सभा मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्ताकंनासाठी ग्रामीण पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी चार चाकी वाहनाने येताना टोलचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यांना टोलमध्ये सुट द्यावी, अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीनं लावून धरली आहे. 

शासकीय वृत्तसंकलन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकार नियमीतपणे जिल्ह्याच्या ठिकाणी येत असल्याने त्यांना टोलचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. पत्रकार सुरक्षा समिती वतीने 16 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडं पत्रकारांसाठी टोलमुक्तिचं  निवेदन सादर करण्यात आले होते, त्याचबरोबर विभागीय आयुक्त (पुणे) यांना देखील पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने 12 सप्टेंबर 2025 रोजी पुणे येथे भेटून निवेदन दिले होते.

राज्य सरकार पत्रकारांच्या प्रश्नावर नेहमीच उदासीन भूमिका घेत असून पत्रकारांच्या प्रश्नावर निर्णय घेण्यास नेहमीच विलंब होत आहे. त्याचा नोंदवण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीने रस्त्यावर उतरले. सोलापूर येथे ग्रामीण भागातील पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना, टोलमधून सूट देण्याच्या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी एकमेव मागणीसाठी घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

टोलमुक्तीबाबत घ्यावा लवकर निर्णय, अन्यथा परिवहन मंत्र्याच्या दालनासमोर आंदोलन : यशवंत पवार

पत्रकारांच्या प्रश्नाबाबत राज्यसरकार नेहमीच उदासीन असून पत्रकारांच्या चालढकल करत असल्याचा आरोप करत पत्रकारांच्या टोलबाबत थेट परिवहन मंत्र्याच्या दालनसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला.

पत्रकारांच्या चारचाकी टोल मुक्तीसंदर्भात राज्य सरकारने करावा गांभीर्याने विचार : रामचंद्र सरवदे 

पत्रकारांच्या चारचाकी वाहनाच्या टोल प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणीचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी उपोषणवेळी केली असून गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला देखील राज्यसरकारला दिला.

सरकारने टोलसंबंधी घ्यावा वेळीच निर्णय : राम हुंडारे 

गेल्या आठ वर्षांपासून राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती अतिशय आक्रमक व प्रभावीपणे काम करत असून पत्रकारांचे प्रश्न राज्य सरकार कडे पोटतिडकीने मांडून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पत्रकारांच्या चारचाकी वाहनाच्या टोलसंबंधी  राज्य सरकारने वेळेत निर्णय घायला हवा, असं प्रतिपादन पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष राम हुंडारे यांनी यावेळी केलं.

याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा सचिव अंबादास गज्जम, संघटक सादिक शेख, शहराध्यक्ष आन्सर तांबोळी, कार्याध्यक्ष राजू वग्गू, सचिव अरुण सिडगिद्दी, कार्यकारी शहर अध्यक्ष वसीमराजा बागवान, समन्वयक लक्ष्मण सुरवसे, दैनिक लोकशाही मतदार चे अक्षय बबलाद, दैनिक अबतक चे प्रसाद जगताप, गणेश दासरी, अबीद तांबोळी, सिद्धार्थ भडकुंबे, श्रीनिवास पेद्दी, महाराष्ट्र पोलीस वार्ता चे अमोल कुलकर्णी, गणेश भालेराव, जाकीर हुसेन हुंडेकरी यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top