सोलापूर : राज्यात अनेक जिल्ह्यात पूरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाकडून नुकसानग्रस्तांसाठी मदतीची भूमिका तर घेण्यात आलीच आहे. याशिवाय खारीचा वाटा म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्यातील संस्कार आचलारे शाळकरी विद्यार्थ्यानं वाढदिवसाचा खर्च टाळून पुरग्रस्तांसाठी मदत केली.
यंदा मे महिन्यापासून सोलापूर जिल्हाभरात सर्वत्र पाऊस आहे. या पावसामुळे जिल्हाभरातील खरीप पिकं शंभर टक्के उध्वस्त झाली आहेत. याशिवाय माढा, करमाळा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ व बार्शी या तालुक्यात सीना नदीकाठच्या गावात पूरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीत यंदा शेतीचे तर नुकसान झालेच, शिवाय घरात पाणी शिरल्याने घरातील धान्य, संसारोपयोगी साहित्याची मोठी हानी झाली आहे. जनावरांचेही मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसापासून पूरग्रस्तांना अजूनही विस्थापित जीवन जगण्याची वेळ आली आहे.
अतिवृष्टी अन् पूरामुळे शेतकऱ्यांची प्रचंड मोठी हानी झाली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारची होईल तेवढी मदत तोकडी पडणार आहे. पूरग्रस्तांसाठी मदतीचा व माणुसकीचा एक हात पुढे येण्याची आत अत्यंत गरज असून या दृष्टीने खारीचा वाटा म्हणून वाढदिवसाचा खर्च टाळून दीड हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांसाठी दिली असल्याची माहिती बोरामणी येथील इयत्ता सातवीत शिकत असलेल्या संस्कार आचलारे याने दिली.
...चौकट
क्यूआर कोडच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीस देणगी
पूरग्रस्तांना राज्य शासनाकडून सर्वाधिक मदत व्हावी, ये हेतूने मुख्यमंत्री सहायता निधीत थेट क्यूआर कोडच्या माध्यमातून घरबसल्या मदत करता येते. त्यामुळे नागरिकांनी स्वयं प्रेरणने पुरग्रस्तासाठी मदतीसाठी एक हात पुढे करावा, असे आवाहनही यानिमित्ताने संस्कार संतोष आचलारे याने केलं आहे.
त्याचं हे पाऊल छोटं असलं तरी अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे, हे मात्र नक्की !
शब्दांकन : गौतम गायकवाड
