तडीपारीच्या 'घावा' ने अनेकांचे प्रपंच उध्वस्त; विभागीय आयुक्तांकडं मिळाला अन्यायकारक तडीपारीला न्याय

shivrajya patra

सोलापूर : वाढदिवस म्हटलं की, आनंदोत्सव आलाचं...हार-तुरे अन् शुभेच्छांचा वर्षाव आलाच... फटाक्यांची आतषबाजी झाली तर त्याच्या सर्वदूर जाणारा धमाक्याचा आवाज ज्यांच्या कर्णपटलापर्यंत पोहोचतो, ते सहजा-सहजी न सांगताही समजून घेतात ... वाढदिवस साजरा होतोय. त्या क्षणी परस्परांच्या जिव्हेवर गोडवा वृद्धिंगत करणारा शर्करायुक्त केक आलाचं !

असाच एक वाढदिवस म्हणा की वर्धापन दिन... शनिवारी,13 सप्टेंबर रोजी सायंकाळी जिल्हा परिषदेसमोरील पदपथावर साजरा झाला, ज्या क्षणाला हार-तुरे अन् शुभेच्छा वर्षाव... फटाक्यांची आतषबाजी अशा प्रदर्शनाला फाटा देत कोणत्याही जन-सामान्याला तसूभरही कष्ट पडणार नाही, याची सर्वांगाने काळजी घेत केक कापून एका तडीपारीचा वाढदिवस वा वर्धापनदिन साजरा झाला. 

हल्ली, '07 च्या घरात' असं साचाबध्द आयुष्य जगणारा सामान्य माणूस तडीपारीत जातो, तेव्हा पोलीस दफ्तरी, त्याच्या अपराधांचा आलेख उंच असतो, अशी सामान्यांची धारणा असते. अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले पत्रकार, न्यायासाठी लढणारे माहिती अधिकार कार्यकर्ते, व्यवस्थेविरुद्ध दंड थोपटून कार्य व्यवस्था परिवर्तनासाठी झटणारा परिवर्तनवादी वर्ग 'तडीपारी' च्या चक्कीत भरडला जातो, त्याच्या वेदना शब्दांकित होण्या पलिकडच्या असतात. 

99 अपराधी सुटले तरी चालतील, मात्र 01 निर्दोष सुळावर जाऊ नये, अशी आमची आदर्श न्याय व्यवस्था ... ! कायदा व सुव्यवस्थेसाठी कार्यरत पोलीस यंत्रणा 24 तास डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावते. त्या कर्तव्यास प्रामाणिक  वा 'जमीर' जिंदा असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळं त्यांचा लौकिक जगाच्या पाठीवर वाढतो. ही वस्तुस्थिती आहे. 

समाजातील 04 नालायकांमुळे एखादा समाज बदनामीच्या चौकटीत येतो, तद्वत एखाद्या यंत्रणेतील बेजबाबदार अधिकारी वस्तुस्थितीकडं कानाडोळा करीत-चौकशी फाट्यावर ठेऊन धनिकांशी 'अभद्र युती' करतात. त्यावेळी तडीपारीच्या घावानं सैपन सारख्यांचा प्रपंच उद्ध्वस्त होतो. त्याच्या स्मृति पदोपदी जाग्या राहाव्यात म्हणून 'एकला चलो रे' सैपनने त्याच्या तडीपारीचा पहिला वाढदिवस वा वर्धापन दिन केक कापून साजरा केला. 

सध्यस्थितीच्या गढूळ वातावरणात, भ्रष्ट व्यवस्थेतील असंगाशी छातीठोकपणे लढणारे चार-चौघे आहेत, म्हणून सांजवेळी रात्रीच्या गर्द अंधाराच्या गर्भात उद्याची प्रकाश किरणं लपली आहेत, असा आशावाद जिवंत असणाऱ्या वर्गाचा एक प्रतिनिधी म्हणून सैपन स्वत:कडं पाहतोय.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धमकीमुळे सध्या करमाळ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा चर्चेत आहेत. या धमकी प्रकरणी उपमुख्यमंत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पत्रकार सैपन शेख याचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर, 10 सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.

दरम्यान, 13 सप्टेंबर रोजी पत्रकार शेख यांनी त्याच्या तडीपारीचा पहिला वाढदिवस वा वर्धापन दिवस साजरा करताना सर्वप्रथम, त्याचं निमंत्रण पत्र डिजिटल रुपी सदऱ्यावर छापून परिधान केलं होतं. त्याच्या कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या तडीपारित ज्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आला, ज्यांच्या सहकार्यामुळे अन्यायकारक तडीपारी रद्द झाली, त्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य लाभलेल्या सर्वांनाच सामाजिक माध्यमातून निमंत्रित केलं होतं. 

सोलापुरातील सर्व महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन करून, त्याच्या भाव-भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवून कोणत्याही 'बंदी' चा भंग न होऊ देता, दोन धडधाकट आणि दोन दिव्यांगांच्या साक्षीने केक कापून तडीपारी चा वर्धापन दिवस साजरा झाला. तडीपारीची कारवाई झाल्यावर नव्या शहरात एक माणूस फूटपाथवर येत नाही, त्याचं कुटुंब संकटात येतं, असे अनेक सैपन सोलापुरात आहेत. कायद्याचं 'रण मैदान ' लढविले. ज्यांची-ज्यांची तडीपारी रद्द झाली, त्या सर्व 'रण' जीतांना निमंत्रण देण्यात आले होते. ज्यांना-त्यांना भावना पोहोचल्या, बस्स इतकेच, असेच म्हणावं लागेल.

....चौकट 

माझ्यावर केवळ आकस आणि सूडबुद्धीने लादलेल्या तडीपारीला जे जबाबदार अधिकारी व राजकीय पुढारी कारणीभूत आहेत, तसेच या खडतर वाटचालीत ज्यांचं-ज्यांचं मला सहकार्य लाभलं, त्या सर्वांप्रति ऋण भाव व्यक्त करण्यासाठी  आग्रहाने आमंत्रित केलं होतं, माझ्या भावना त्यांच्यापर्यंत तसेच त्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. त्या तडीपारी विरुद्ध मी, विभागीय आयुक्तांकडं अपील केलं होतं, त्यांनी याची सखोल पडताळणी करुन ही तडीपारी अनुचित असल्याचे स्पष्ट करून मला न्याय दिला होता, त्यांचाही मी ऋणी आहे.

संपादक सैपन शेख, MD 24 News 

To Top