सोलापूर : जिल्ह्याच्या इतिहासात नोंद झालेल्या आणि न भुतो न भविष्यती अशा महाकाय स्वरुपाच्या महापूरामुळे सिना नदीच्या खोऱ्यातील गावांना भयंकर असा फटका बसला.
त्यातच सोलापूर-विजयपुर या सर्वात मोठ्या वाहतुकीचे वर्दळ असलेल्या महामार्गावर मौजे हत्तुर येथे चक्क महामार्गावरच ८ ते १० फुट महापुराचे पाणी जमा झाल्याने सोलापूर-विजयपुर-मोहोळ हा मार्ग वाहतुकीसाठी ३ दिवस बंद होता. हा महामार्ग शुक्रवारी खुला झालाय.
यामुळे या महामार्गावरील जड वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरांची खाण्या-पिण्याची मोठी अडचण निर्माण झाली होती. जवळपास १० किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. 
ही वाहतूकदारांची अडचण लक्षात घेऊन विजयपुरा टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड, नांदणी यांच्या वतीने पाणी बॅाटल, जेवणाचे पाकीट, फळे वाटप करण्यात आले. यामुळे वाहतूकदारांचे जेवणाचा प्रश्न नांदणी टोलवेजने मिटवला व सर्व गाड्यांना पद्धतशीरपणे पोचवण्याचे काम टोलच्या सर्व विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले. या सेवाभावी उपक्रमाचं अनेकांनी कौतुक करण्याबरोबरच धन्यवाद म्हटलंय.
शब्दांकन : चंद्रशेखर गायगवळी
