05 वर्षे मिळणार केंद्र शासनाची वार्षिक 06 लाखांची शिष्यवृत्ती
सोलापूर : आंतरराष्ट्रीय जलतरणपटू बिल्वा अनिल गिराम ही CSIR-NET परीक्षा शारीरिक शास्त्र (Physical Sciences) विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणारी बिल्वा सोलापुरातील पहिलीच विद्यार्थिनी आहे. तिला केंद्र शासनाकडून वार्षिक 06 लाखांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. यापुढील 05 वर्षे तिला ही शिष्यवृत्ती मिळणार आहे.
आता ती लेक्चरशिप व पी.एच.डी साठी पात्र ठरली आहे. या यशानंतर बिल्वाने पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी (IITM) या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या अग्रगण्य संशोधन संस्थेत पी.एच.डी. साठी प्रवेश मिळवला आहे.
बिल्वा हिने आपले एम.एस.सी. अॅटमॉस्फेरिक अँड स्पेस सायन्सेस हे पदव्युत्तर शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. त्यांच्या एम.एस.सी. प्रकल्पासाठी 2024 सालचे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्राप्त नामांकित हवामान शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोळ्ल यांचे मार्गदर्शन लाभले.
भविष्यात तिचा पृथ्वी विज्ञान विषयात संशोधन करण्याचा मानस आहे. पृथ्वीवर येणारी वादळे, महापूर, ढगफुटी, त्सुनामी, भूकंप व ज्वालामुखी अशा नैसर्गिक संकटांचा अभ्यास पृथ्वी विज्ञान विषयात केला जातो. या यशामुळे वीरशैव व्हिजन सामाजिक संस्थेच्या वतीने तिचं अभिनंदन करण्यात आले.
बिल्वा ही आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच, राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू व रेल्वे भरारी पथक सदस्य अनिल गिराम यांची सुकन्या आहे.
