(फाईल फोटो)
सोलापूर : दुचाकी व्यवस्थीत दुरूस्त न केल्याचा संशय घेऊन 05 जणांनी, 'हा तर ट्रेलर आहे,' म्हणत तीन नव्या गाड्यांचं नुकसान केले. हा खळबळजनक प्रकार अक्कलकोट रस्त्यावरील आदर्श सुझुकी शोरूममध्ये मंगळवारी दुपारी घडला. या घटनेत 10 हजार रुपयांहून अधिकच नुकसान झालंय. याप्रकरणी सचिन माने याच्यासह 05 जणांविरुद्ध जेलरोड पोलिसांकडं गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अक्कलकोट रस्त्यावरील आदर्श सुझुकी शोरूममध्ये सचिन माने याने त्याची अॅक्सेस गाडी क्र. एम.एच. 13/डीआर 5521 ही दुरूस्तीसाठी दिली होती. ती व्यवस्थित दुरुस्त न केल्याच्या कारणावरून, त्यांची गाडी गेटवर आडवी पाडून शोरूमच्या इतर तीन नवीन गाड्या खाली पाडून नुकसान केले.
त्यानंतर गेटवर ठिय्या मांडून व्हिडीओ शुटींग करून तुमच्या गाड्या आम्ही फोडतो, 'हा तर ट्रेलर आहे,' असे म्हणून धमकी दिली. यावेळी सचिन माने यांने अमोल श्रीशैल येरटे (वय- 39 वर्षे) याला शिवीगाळ करून गोंधळ घातल्याचं अमोलनं तक्रारीत म्हटलंय.
या घटनेत नव्या गाड्यांचे 10 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार अमोल येरटे याने पोलिसांकडं तक्रार दाखल केली. त्यानुसार बुधवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार राठोड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
