लोकसेवेसाठी सामाजिक उपक्रम राबविता यावेत, यासाठी सुरु केलेली चळवळ म्हणजे लोकमंगल फाऊंडेशन होय. सेवा कार्याच्या माध्यमातून लोकमंगल फाऊंडेशन समाजाच्या अनेक क्षेत्रात पोहोचले आहे. अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गरजू, निराधार, वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांना १५ लाखांपेक्षा जास्त डब्बे मोफत देण्यात आले असल्याचे प्रारंभी आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटले.
याचबरोबर लोकमंगल फाऊंडेशन आरोग्य विषयक सेवा, दिव्यांगासाठी साहित्य, शेतकरी वृद्ध सेवा, जलसंधारण, समृद्धग्राम योजना, एकलपालक महिलांचे सक्षमीकरण, विविध शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रातील पुरस्कार, विद्यार्थ्यांसाठी किल्ला बांधणी स्पर्धा अशा अनेक योजनेच्या माध्यमातून मदत करत हा वटवृक्ष गरजवंतांना सावली देत आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचविणे, हे आपले आद्य कर्तव्य मानून फाऊंडेशन काम करीत आहे, असंही आमदार देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यंदाच्या सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये लोकमंगल बँक, लोकमंगल नागरी पतसंस्था, लोकमंगल मल्टीस्टेट, आदी एकूण १०० पेक्षा अधिक माहिती केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख सोमवार, दि.१० नोव्हेंबर अशी असणार आहे, असंही त्यांनी सांगितले.
या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधू-वरास विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे, वरास बूट, वधूस चप्पल, मानाचा आहेर, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणी मंगळसूत्र व जोडवे देण्यात येणार आहेत. ताट, वाटी, ग्लास प्रत्येकी ५ नग, स्टील हंडा, स्टील डबा, तांब्या आदी संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. वधू-वरास वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी समुपदेशन देखील केलं जाते. ५० हजार वऱ्हाडी मंडळीच्या भोजनाची सोय केली जाणार आहे. वधू-वरांची सोलापूर शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूकही काढण्यात येणार आहे. वधू- वरासोबत येणाऱ्या वऱ्हाडी मंडळी संख्येवर बंधन असणार नाहीत, असंही आमदार देशमुख यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेस लोकमंगल फाउंडेशनचे शशिकांत थोरात, अभय पटणे, उत्तम शिंदे, मारुती तोडकर आणि सुजाता सुतार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छुकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन लोकमंगल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी लोकमंगल फाऊंडेशन ऑफीस, विकास नगर येथे संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी ७७२००९६४८८, ०२१७-२६०६०७०.
... चौकट
सामुदायिक विवाह सोहळ्यात आजवर ३,१५३ जोडपी विवाहबद्ध
फाऊंडेशन तर्फे यंदाचा होणारा ४६ वा सामुदायिक विवाह सोहळा आहे. आतापर्यंत ३,१५३ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. यामध्ये हिंदू २,४४३, बौद्ध ६,७८, मुस्लिम २१, जैन ७ तर ख्रिश्चन समाजाचे ४ विवाह झाले आहेत. सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहेत, असेही आमदार देशमुख यांनी यावेळी सांगितले.
...चौकट
जोडप्यांच्या मुलांनाही फाऊंडेशनतर्फे मदत
लोकमंगल फाऊंडेशनच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात आजवर विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांच्या मुलांनाही फाऊंडेशनतर्फे मदत केली जाते, त्यांना लोटस योजनेद्वारे शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याची योजना फाऊंडेशनमार्फत राबवली जाते. याचा अनेकांनी लाभही घेतला आहे, तसेच विवाह झालेल्या जोडप्यांना व्यवसायासाठी-रोजगारासाठी देखील मदत केली जाते.
... चौकट
... दिव्यांगासाठी नोंदणी आल्यास वेगळा विवाह सोहळा भरवण्याचा मानस : आमदार देशमुख
लोकमंगल फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील कुठल्याही गावात ०५ पेक्षा जास्त जोडप्यांचे लग्न जमले असल्यास त्याच गावात विवाह सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात येते. येत्या काळात दिव्यांगासाठी देखील नोंदणी आल्यास वेगळा विवाह सोहळा भरवण्याचा मानस आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.
... चौकट
लोटस योजनेच्यातून गरजू विद्यार्थ्यांना ८५ लाखापर्यंतची शिष्यवृत्ती
लोकमंगल फाऊंडेशनने शैक्षणिक मदतीसाठी लोटस योजनेच्या माध्यमातून गुणवंत, गरीब, गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन ८५ लाखापर्यंतची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. यंदा १०० पेक्षा जास्त शाळामधून गरजू, एकल पालकांच्या विद्यार्थ्यांना १ लाख वह्यांचे वाटप करण्यात आलंय. तसंच धार्मिक, सांकृतिक प्रचार, प्रसिद्धीसाठी भजन-भारुड स्पर्धांचे आयोजन, भजनी मंडळांना साहित्य वाटप देखील करण्यात येते.
