सोलापूर : शेतकरी कर्जमाफी, उस, कांदा, सोयाबीन, कापूस, दुध दर, मराठा धनगर व इतर जात समूहाचे आरक्षण, निवडणूका बॅलेट पेपरवर घेणे, अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई तात्काळ जाहीर करावी, यासह अन्य मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्ह्याच्या वतीने शुक्रवारी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. 
आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवश्री दिनेश जगदाळे, पुणे विभागीय सदस्य शिवश्री सोमनाथ राऊत, पंढरपूर विभागीय अध्यक्ष शिवश्री बाळासाहेब बागल, शहर अध्यक्ष शिवश्री प्रकाश ननवरे, सचिन चव्हाण, निंबराज जाधव, कल्याण गव्हाणे, दत्ता जाधव, श्रीनिवास सावंत, स्वप्निल गायकवाड, अजितसिंह सोमदळे, आबा सावंत, प्रकाश सातपुते, विष्णु मुळे, सत्यम धुमाळ, कुमार म्हमाणे, प्रकाश डोंगरे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
या निवेदनात विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे, ऊस, कांदा, सोयाबीन, मुग, तूर, सह अन्य शेतमालांना हमीभाव द्यावा, दुधाच्या दरात वाढ करावी, मराठा, धनगर व इतर जात समूहांचे आरक्षण आदी प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे, सरसकट शेतकरी कर्जमाफी करून बळीराजाला सुखी करावं, मराठा समाजाला आरक्षणाचा संवैधानिक हक्क प्रदान करावा, मराठा, ओबीसी व इतर असा जातीय संघर्ष-तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. ऊसाला एफ आर पी प्रमाणे दर देऊन 07 दिवसांत पेमेंट देण्याचे आदेशित करावे. प्रत्येक कारखान्याचा वजन काटा पारदर्शक असावा, याबाबत कायदा करावा. 
दुध भेसळ बंद करून दुधाला 70 रुपये दर जाहीर करावा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात, सरकारमधील काही जबाबदार मंत्री, प्रतिनिधी आरक्षण आंदोलनावर विक्षिप्त विधाने करून जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. जबाबदारीने हा विषय निकाली काढावा. आदी मागण्यांचा समावेश आहे.नसता या लोकहिताच्या मागणीसाठी राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
