राष्ट्रसंत प्राथमिक शाळा व विश्वभूषण विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा
सोलापूर : आजच्या तरुणाईसमोर स्वातंत्र्याचा वारसा जपण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. शिक्षणातून समाज प्रबोधन घडविण्याचं कार्य होतं. प्रत्येकानं राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, असं प्रतिपादन अण्णासाहेब भालशंकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.
अक्कलकोट रोडवरील सद्संकल्प शिक्षण समूहाच्या राष्ट्रसंत प्राथमिक शाळा व विश्वभूषण विद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीचं जोशमय वातावरण आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आर. एन. कांबळे (संचालक-सदसंकल्प शिक्षण समूह सोलापूर.) व कृष्णा सुरवसे (मेजर) उपस्थित होते. सद्संकल्प शिक्षण समूहाचे संस्थापक सचिव अण्णासाहेब भालशंकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, तसेच माजी विद्यार्थी व अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वभूषण विद्यालयाचे मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवे यांनी करताना स्वातंत्र्य दिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, जोशपूर्ण भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांना भारावून टाकले. प्रमुख अतिथी कृष्णा सुरवसे (मेजर) यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व स्वातंत्र्याच्या काही गोष्टी सांगितल्या.
सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले, तर संतोष वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले. शिस्तबद्ध व भव्यतेने पार पडलेल्या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षकवृंद, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
