...स्वातंत्र्य चिरकाल टिकवण्यासाठी अगोदर देशाला प्राधान्य असले पाहिजे : प्रा. डॉ. देशमुख

shivrajya patra

...स्वातंत्र्य चिरकाल टिकवण्यासाठी अगोदर देशाला प्राधान्य असले पाहिजे : प्रा. डॉ. देशमुख 

स्वातंत्र्यदिनी फॅमिली प्लॅनिंगच्या कार्यालयात ध्वजारोहण

सोलापूर/सोहेल शेख : आपल्याला स्वातंत्र्य सहजा-सहजी मिळालेले नाही, यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. मिळालेले स्वातंत्र्य चिरकाल टिकवण्याची जबाबदारी युवा-पिढीची आहे. जात, धर्म, पंथ आणि भाषा यांच्या अगोदर देशाला प्राधान्य असले पाहिजे, असं प्रतिपादन फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांनी केले.

फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, येथील शाखेच्या, भवानी पेठ येथील मुख्य कार्यालयात 79 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख बोलत होते.

यावेळी फॅमिली प्लॅनिंग सोलापूर शाखेचे चेअरपर्सन प्रा. डॉ. एन. बी. तेली, मार्गदर्शक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगांवकर, माजी अध्यक्ष प्रा. डॉ. नभा काकडे, माजी उपाध्यक्ष रमणलाल सोनीमिंडे, सदस्य श्रीकांत सातर्ले, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड, कार्यक्रम अधिकारी वीरेंद्र परदेशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता चंडक, अकाउंट्स ऑफिसर व्यंकटेश मच्छा आदींसह कर्मचारी, वालचंद कला व विज्ञान महाविद्यालय, समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. 

याप्रसंगी वालचंद समाजकार्य विभागाची विद्यार्थीनी वैभवी गोटे हिने देशभक्ती गीत सदर केले तर अलिश्‍बा सोहेल मुजावर या लहान मुलीने देशभक्तीपर भाषण केले.

याप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. देशमुख म्हणाले की, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. विविधता हीच त्याची विशेषता आहे. अशी विविधता जगातील कोणत्याही देशात आढळत नाही. बहुसंस्कृतिकता हेच भारताचे वैशिष्ट्य आहे. या देशात अनेक धर्म, अनेक पंथ ,अनेक भाषा व बोली भाषा,अनेक वंश, अनेक चालीरीती, अनेक जाती- उपजाती एकत्रित नांदत आहेत.

देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. स्वातंत्र्यानंतर मिळालेल्या लोकशाहीसमोर आज अनेक आव्हाने उभी आहेत. लोकशाहीची मूल्य लोकमाणसात खोलवर रुजली पाहिजेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असंही प्रा. डॉ. देशमुख यांनी सांगितलं.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटेश कंची यांनी केले तर सुगतरत्न गायकवाड यांनी शेवटी सर्व उपस्थितांचं आभार मानले.

... चौकट

या लोकशाहीचं सक्षमीकरण करणे, हे सर्वांचे उद्दिष्ट असले पाहिजे : प्रा. डॉ. देशमुख

विविधता हीच या देशाची शक्ती आहे. भारताच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये सहिष्णुता आणि समावेशकता या दोन मूल्यांना अक्षय स्थान प्राप्त व्हावे. भारतीय लोकशाही ही बहुपक्षीय लोकशाही आहे. या लोकशाहीचं सक्षमीकरण करणे, हे सर्वांचे उद्दिष्ट असले पाहिजे, असंही प्रा. डॉ. देशमुख यावेळी सांगितले.



To Top