PGI मध्ये सोलापूरचा उजवा ठसा — राज्यात तिसरा क्रमांक; प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांचा प्रधान सचिवांच्या हस्ते गौरव

shivrajya patra

सोलापूर : परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (PGI) या शालेय शिक्षण मूल्यांकन प्रणालीमध्ये महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शालेय शिक्षण विभागाचे माननीय प्रधान सचिव मा. रणजितसिंह देओल यांच्या शुभहस्ते, राज्यस्तरीय कार्यशाळेत प्राथमिक शिक्षणाधिकारी  कादर शेख,माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, डायट चे प्राचार्य राजे व योजना शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांच्या समवेत गौरव स्वीकारण्यात आला.

या यशामागे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  कुलदीप जंगम यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन, तसेच शिक्षण विभागातील सर्व घटकांचे एकत्रित परिश्रम आणि समर्पण हे कारणीभूत ठरले आहेत.

याप्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सर्व शिक्षण विभागाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त करत म्हटले की, “ही जिल्ह्याच्या एकत्रित प्रयत्नांची फलश्रुती आहे. शिक्षक, सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, कर्मचारी, सर्वांनी जबाबदारीने काम करत सोलापूरचे नाव उज्ज्वल केले आहे. आपण सर्वांनी याच आत्मियतेने पुढेही कार्य करत राहावे.”

PGI (Performance Grading Index) ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत विकसित केलेली एक मूल्यांकन प्रणाली आहे. यामध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या शालेय शिक्षणाच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात येते. PGI चा उद्देश म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणास चालना देणे, कमकुवत बाबींचा शोध घेऊन सुधारणा सुचवणे आणि डेटा-आधारित धोरणनिर्मितीला प्रोत्साहन देणे.

PGI मध्ये एकूण १००० गुणांची रचना असून त्यात ५ प्रमुख घटक आणि विविध उपघटक आहेत. या प्रणालीमुळे राज्यांमध्ये गुणवत्तेवर आधारित स्पर्धा निर्माण होते व सुधारण्याच्या दिशा स्पष्ट होतात.

To Top