धमकी दिलेल्या गांव-गुंडांवर पत्रकार संरक्षण अॅक्ट कायद्यानुसार व्हावी कठोर कारवाई : पत्रकार शेख

shivrajya patra

सोलापूर : टाईम्स 45 न्यूज यू-ट्यूब चैनल माळशिरस तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले रशिद गुलाब शेख यांना जीवे मारण्याची धमकी दिलेल्या गांव-गुंडांवर पत्रकार संरक्षण अॅक्ट कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलीय. पत्रकार रशिद शेख यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडं गुरुवारी निवेदन देऊन ही मागणी केलीय.

माळशिरस तालुक्यातील चांदापुरी गांवचे रहिवासी तथा टाईम्स 45 न्यूज यू-ट्यूब चैनलचे तालुका प्रतिनिधी/पत्रकार रशिद यांच्यावर चांदापुरी चौकात भिमराव जिजाबा ढेरे आणि अन्य गांव-गुंडांनी धावत अंगावर येऊन जीवे मारण्याची धमकी दिली. ' तुला खल्लास करेन, तुझ्या भावाला सुध्दा खल्लास करेन ' अशी धमकी देत होते. दरम्यान अर्वाच्च भाषेत शिव्या देणे सुरुच होते. हा सामान्यांच्या मनात धडकी भरवणारा प्रकार १ जुलै रोजी घडला.

ढेरे-पुकळे गावगुंड टोळीची चांदापुरी गांव अन् पंचक्रोशीत प्रचंड मोठी दहशत आहे. गावातील आणि परिसरातील लोक त्यांना घाबरून असल्यामुळे त्याची तक्रार कोणी देत नाही. कारण या गांवगुंडावर तक्रार केली की, माळशिरस तालुक्यातील खुडूस येथील, त्यांच्या  सासरवाडीकडील लोक येऊन तक्रारदाराला मारहाण करुन ' राडा ' करुन जातात, हा पत्रकार या नात्याने रशिद शेख यांचा कटू ' अनुभव ' आहे.

या प्रकरणी पत्रकार रशिद शेख यांनी, ०३ जुलै २०२५ रोजी अकलूज उप-विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे आणि माळशिरस पोलिस ठाण्यात निवदेन देऊन सर्व हकीकत सांगून सुध्दा आजतागायत ह्या गाव-गुंडावर कारवाई केली नाही, त्यामुळं गावामध्ये दमदाटी-शिवीगाळ, मारहाण इत्यादी गोष्टी वाढत चालल्या आहेत, यांचं पत्रकार शेख यांना शल्य आहेच.

भिमराव जिजाबा ढेरे, बाळासाहेब जिजाबा ढेरे, सतपाल बाळासाहेब ढेरे, वैभव भिमराव ढेरे  मुगुटराव हणमंत पुकळे, संतोष मुगुटराव पुकळे आणि रणजित मुगुटराव पुकळे (सर्व रा. चांदापुरी ता.माळशिरस व भिमराव ढेरे यांच्या सासरवाडीकडील मेहुणे ,सासरे हे पैलवान मंडळी अशी या गांवगुंडाची नावे असल्याचं पत्रकार शेख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्याकडं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

या निवेदनाची प्रत माहितीस्तव राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता विधान सभा, विधान परिषद महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हाधिकारी-सोलापूर, पोलीस उपविभागीय अधिकारी (अकलूज विभाग), वरिष्ठ पोलीस निरीक्षक, माळशिरस पोलीस ठाणे,  प्रांत अधिकारी (अकलूज विभाग) आणि तहसिलदार माळशिरस यांना माहितीस्तव पाठविण्यात आलं असून शेख कुटुंबियांचं संरक्षण व्हावं, अशी मागणी शेख यांनी शासनाकडं केलीय.

To Top