पैसे घेऊन भांडी वाटप करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास सामुदायिक आत्मदहन : विष्णू कारमपुरी

shivrajya patra

सोलापूर/सोहेल शेख : बांधकाम क्षेत्रातील कामगारांना गृह वस्तू वाटप करताना, ठेकेदार कामगारांकडून १००० ते १५०० रुपये घेऊन भांडी संच देत आहेत. अशा सोलापुरातील ठेकेदारांवर ताबडतोब कारवाई व्हावी, अन्यथा बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा, संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी व उपाध्यक्ष अंगद जाधव यांनी शुक्रवारी दिला.

सोलापुरातील बांधकाम कामगारांना देण्यात येणारे भांडी संच देताना, ठेकेदार कामगारांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी संघर्ष समितीकडे बांधकाम  कामगारांकडून आल्याने, संघर्ष समितीच्या वतीने, अहिल्याबाई होळकर विद्यापीठ येथील भांडी वाटप केंद्रासमोर निदर्शने व व धरणे आंदोलन केले.

यावेळी आंदोलकांनी बांधकाम कामगारांना मोफत भांडी मिळालेच पाहिजे, पैसे घेऊन भांडी वाटप करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे, बांधकाम कामगारांच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्या महायुती सरकारचा धिकार असो, 'आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा ', अशा घोषणा दिल्या. 

यावेळी माध्यमांशी बोलताना विष्णू कारमपुरी व अंगद जाधव म्हणाले की, खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व बांधकाम कामगारांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्तांपासून कामगार मंत्र्यांपर्यंत अनेक वेळा निवेदने दिली, वेगवेगळी तीव्र आंदोलने केली, परंतु कुठलीही कार्यवाही ठेकेदारावर, दलालावर व कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली नाही. उलट ठेकेदार आमच्या संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला व करीत आहेत. 

त्यामुळे कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे, म्हणून आता संघर्ष समितीच्या वतीने 'ना भूतो, न भविष्यती' असे आंदोलन म्हणजेच ३१ जुलै रोजी सहाय्यक कामगार आयुक्तलासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा विष्णू कारमपुरी आणि अंगद जाधव यांनी दिला.

या आंदोलनात विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, प्रसाद जगताप, संतोष जाधव, पप्पू शेख, शिवाजी वाघमोडे, शरणाप्पा जगले, सलीम शेख, कबीर तांबोळी, सचिन गायकवाड, बाळासाहेब हजारे, आनंद शेळके, आनंद कोकणे, राहुल जाधव, राधिका मिठ्ठा, पद्मा म्याकल, लक्ष्मीबाई गुंटला, लक्ष्मी शेरला, अनिता रच्चा, लक्ष्मीबाई मालपुरी यांच्यासह समितीचे पदाधिकारी सामील झाले होते.  

--- फोटो मॅटर

बांधकाम कामगारांकडून भांडी वाटप करताना, पैसे घेत असल्याच्या विरोधात बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने, कोंडी येथे भांडी वाटप केंद्रासमोर, भव्य निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी विष्णू कारमपुरी, अंगद जाधव, सोहेल शेख, गणेश बोड्डू, वैशाली बनसोडे, रेखा आडकी यांच्यासह अन्य आंदोलक दिसत आहेत.

To Top