सोलापूर : शिंदे परिवारातील त्रिकुटानं नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एका तरुणीची जवळपास २७ लाखाची फसवणूक केलीय. हा प्रकार एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२५ दरम्यान घडला. या घटनेत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अंजली सुर्यकांत शिवशरण हिने विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार एका महिलेसह तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील विजापूर रोड, विश्व नगर चंडक मळा मधील रहिवासी अंजली सुर्यकांत शिवशरण हिचा विश्वास संपादन करून तलाठी पदावर नोकरी लावण्याच्या आमिषानं गौतम आप्पा शिंदे, त्याची पत्नी आणि मुलानं वेळोवेळी रोख आणि ऑनलाईन स्वरूपात २६, ६१, ५०० रूपये इतकी रक्कम घेतली.
सुमारे दोन वर्षे नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या अंजली शिवशरण हिने शिंदे परिवाराला दिलेली रक्कम परत मागितली, त्यावेळी शिंदे कुटुंबानं घेतलेली लाखो रुपयांची रक्कम देण्याऐवजी टाळाटाळ सुरू केली. नोकरी मिळविण्याच्या आडमार्गात आर्थिक फसवणूक झालेल्या अंजलीने पोलीसांकडं ठाण्यात धाव घेतली.
अंजली शिवशरण हिच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलिसांनी गौतम आप्पा शिंदे, सौ. सरोज गौतम शिंदे आणि रितेश गौतम शिंदे (सर्व रा. उध्दव नगर भाग-२ ओम गर्जना चौक, विजापूर रोड, सोलापूर.) यांच्याविरुद्ध २०२५ भा.न्या. संहिता कलम ३१८(४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक पवार या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.