सोलापूर : सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव विठ्ठल गव्हाणे यांची ६०,००० रुपयांची रोकड असलेली गहाळ झालेली बॅग शोधून देण्यात फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकातील पोकॉ/१८८५ अमोल मल्लिकार्जुन खरटमल यांनी दाखविलेली सतर्कता अन् अनोळखी व्यक्तिची प्रामाणिकता मोलाची ठरली. ही घटना शुक्रवारी, १८ जुलै रोजी घडली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापूर आकाशवाणी केंद्राजवळील श्रीदेवी नगरातील रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव विठ्ठल गव्हाणे (वय-७० वर्षे) यांनी होटगी रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून पेन्शनचे ६० हजार रुपये काढून ते पैसे त्यांच्या बॅगेमध्ये ठेवले होते.
ते तेथून लकी चौकातील स्वास्तिक मिठाई दुकानात जाऊन तेथून मिठाई खरेदी केली. त्यानंतर नवीपेठ येथील दिवेकर बेकरीमध्ये बेकरीचे साहित्य खरेदी करण्यास गेल्यावर त्यांना ६० हजार रुपये ठेवलेली बॅग कोठे तरी पडली असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा ज्येष्ठ नागरिक तथा मुख्याध्यापक महादेव गव्हाणे यांनी पोलीस मदतीसाठी फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठले. त्यांनी घडलेली ' हकिकत ' पोलिसांना सांगितली.
तेव्हा वरिष्ठांनी पोलीस ठाण्याकडील डी. बी. पथकातील पोकॉ/१८८५ अमोल मल्लिकार्जुन खरटमल यांना महादेव गव्हाणे यांच्याविषयी माहिती देऊन पुढील कार्यवाही करण्यासंबंधी सुचना दिल्या.
पो. कॉ. खरटमल यांनी लकी चौक ते नवीपेठ दरम्यानचे सी.सी.टी.व्ही. फुटेज पाहिले असता, त्यामध्ये महादेव गव्हाणे यांची बॅग बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नवीपेठ जवळ पडल्याचे अन् ती बॅग एक अनोळखी व्यक्तीने घेऊन बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नवीपेठमध्ये गेल्याचे निदर्शनास आले.
ती बॅग त्या अनोळखी व्यक्तिने प्रामाणिकपणे बँकेत जमा करुन गेला असल्याची माहिती मिळाली. त्या बॅगबाबत खात्री करुन रक्कम ६०,००० रुपयांसह ज्येष्ठ नागरीक महादेव गव्हाणे यांच्या ताब्यात दिली.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ/१८८५ अमोल मल्लिकार्जुन खरटमल यांनी पार पाडली.