सोलापूर : पत्नी भाग्यश्री हिची अमानुषपणे हत्या करून पतीने थेट पोलीस ठाण्याची पायरी चढून पोलीस अधिकाऱ्यांना खबर दिली. ही खळबळजनक घटना येथील वसंत विहारातील स्वराज्य विहारात शुक्रवारी सकाळी ११.५५ वा. च्या सुमारास घडली. मी पोलीस हवालदार चुंगे बोलतोय ... ' तुम्ही स्वराज विहार येथे या ! ' अशा दु:खद घटनेची माहिती भाग्यश्रीच्या माहेरच्या मंडळींना सांगण्यात आले. पत्नीच्या खून प्रकरणी प्रशांत रविंद्र राजहंस या वकिलाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय.
यासंबंधी पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मूळचे मंगळवेढा येथील पंढरपूर रोड मित्रनगरातील रहिवासी प्रशांत राजहंस (वय-४४ वर्षे) हल्ली सहकुटुंब स्वराज विहारात वास्तव्यास आहेत. रत्नदिप भोसले (रा. मिलींद नगर, बुधवार पेठ, सोलापूर) यांचा भाऊ राजरत्न यांचे मोबाईलवर फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून कॉल आला.
त्यांनी मी फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार चुंगे बोलतोय असे सांगून, त्यांनी रत्नदिप विद्याधर भोसले यांना, ' तुमचे भावजी प्रशांत राजहंस यांनी त्यांची पत्नी भाग्यश्री यांचा खून करुन ते पोलीस ठाणे येथे आले आहेत. तुम्ही स्वराज विहार येथे या ' असे म्हटले.
त्यावर रत्नदिप भोसले, भाऊ राजरत्न आणि इतर नातेवाईक स्वराज विहार येथे गेले. त्यावेळी फिर्यादीची बहिण भाग्यश्री ही बेडरुममधील बेडवर रक्ताचे थारोळ्यात पडलेली होती. चाकू बेडवरच पडलेला होता. भाग्यश्रीच्या गळा व मानेवर धारदार चाकूने वार करून जिवे ठार मारल्याचे दिसून आले.
रत्नदिपची बहिण भाग्यश्री ही मंगळवेढा येथे राहण्यास न गेल्याने व तिचा पती प्रशांत राजहंस यास घर बांधण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरुन प्रशांत राजहंस याने पत्नी भाग्यश्रीची चाकूने वार करून हत्या केल्याची फिर्याद रत्नदीप विद्याधर भोसले यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार प्रशांत राजहंस या वकिलाविरुद्ध भा.न्या. सहिता कलम १०३,८५,११५ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक दराडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.