सोलापूर : आठ दिवसांत एफआरपी चुकती करा, अन्यथा साखर कारखाना यंत्रणेला 'सळो की पळो' करून सोडू, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुहास पाटील, कार्याध्यक्ष दीपक भोसले व जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांनी सोमवारी दिला. या पदाधिकाऱ्यांनी सिद्धेश्वर साखर कारखाना कार्यस्थळावर मोर्चा काढून निवेदन दिले. संचालक मंडळाने, मोर्चेकऱ्यांना सोमोरे जाताना दहा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा शब्द दिला.
उत्तर तालुक्यातील कुमठे येथील सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बाहेरच्या गेटपासून आतील गेटपर्यंत शेतकऱ्यांनी घोषणा देत वातावरण दणाणून सोडला. कारखान्याने सरलेल्या हंगामातील तर बरीच रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली नसल्याचा आंदोलकांचा आक्रोश होता. त्यांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याला मागची आठवण करून दिली.
२२-२३ मध्ये प्रति टनाला २५ रुपये व २३-२४ मध्ये प्रतिटन तीनशे रुपये अधिक देण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. बोलल्याप्रमाणे शेतकऱ्यांना दिले नसल्याची यावेळी आठवण करून देण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र युवाध्यक्ष अमोल वेदपाठक, हनमंत गिरी, बाबा ननवरे, लक्ष्मण बिराजदार, दिनेश शिंदे, किरण पाटील, धनराज रुपनर आदी उपस्थित होते.

या मोर्चाला सामोरे जाऊन संचालक सुरेश झळकी, शिवशंकर बिराजदार, बाळकृष्ण बोबडे यांनी दहा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे सांगितले.
.........
शेतकऱ्यांना पैसे का देत नाहीत ?
जिल्ह्यातील माढा, पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील साखर कारखानदारांनी पहिली उचल २८०० रुपये दिली. मात्र, आपल्या कारखान्याने १५०० रुपये दिले हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे, असे यावेळी बोलताना अनेकांनी सांगितले. सोलापूर भागातील साखर कारखानदार शेतकऱ्यांना पैसे का देत नाहीत? असा प्रश्न सुहास पाटील व दीपक भोसले यांनी उपस्थित केला.