राष्ट्रीय गोकुळ मिशन पी. एस. पंढरपुरी प्रकल्पातंर्गत कासेगांव येथे रेतनामार्फत जन्मलेल्या मादी वासरांचा मेळावा

shivrajya patra

कासेगांव : राष्ट्रीय गोकुळ मिशन या अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथे सोमवारी, २१ जुलै रोजी पी.एस. पंढरपुरी या प्रकल्पामार्फत स्वामीराव बरडे (कृत्रिम रेतन सेवादाता) यांच्यामार्फत करण्यात आलेल्या कृत्रिम रेतनामार्फत जन्मलेल्या मादी वासरांचा मेळावा/प्रदर्शन चा कार्यक्रम घेण्यात आला. 

पंढरपुरी म्हैस ही महाराष्ट्रातील म्हैशींपैकी प्रमुख जात असल्याने त्याचे संवर्धनासाठी व अनुवंशिक सुधारणेसाठी केंद्र शासनाचे अर्थसहाय्याने २०१४ पासून महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड, आणंद यांचे सहयोगाने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुर, माढा, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, बार्शी, दक्षिण सोलापुर व उत्तर सोलापुर या ०९ तालुक्यामध्ये वंशावळ निवडीतून उच्च अनुवांशिक गुणवत्ता असलेले पंढरपूरी जातीचे वळू तयार करणे हा प्रकल्प सुरू आहे. 

प्रकल्पामार्फत सध्या ०९ तालुक्यामध्ये ४० कृत्रिम रेतन सेवादाता केंद्रे सुरू आहेत. महाराष्ट्रामध्ये जनावरांच्या कानामध्ये टॅग मारण्याची सुरुवात प्रथम या प्रकल्पामार्फत झाली आहे. २०१९ पासून राष्ट्रीय गोकुळ मिशन या अंतर्गत अर्थसहाय्याने हा प्रकल्प चालू आहे. या प्रकल्पामध्ये काम करणारे सेवादाता हे शेतकऱ्यांच्या दारात जाऊन पंढरपुरी म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाची सेवा देतात.

प्रदर्शनामध्ये आलेल्या रेडकांना त्यांच्या संगोपनानुसार उपस्थित पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत निवड करून ५ ली. कॅल्शिअम, ५ कि.लो. खनिज मिश्रण व १० ली. दुधाचे कॅन चे बक्षीस म्हणून वाटप करण्यात आले व उपस्थित सर्व पशुपालकांना १ कि. लो. खनिज मिश्रणाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी सरपंच यशपाल श्रीकांत वाडकर, उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी चौगुले, डॉ. डी. बी. कदम (प. वि. अ. , प. वै. द. श्रेणी-१) उळे, डॉ. व्ही. व्ही.भडंगे (प.वि.अ., फिरते पशुवैद्यकीय पथक, सोलापूर) डॉ. राजकुमार वसुलकर (प्रकल्प समन्वयक), डॉ. अतुल महाजन (मॉनिटरींग ऑफिसर, एन.डी.डी.बी) हे सर्व उपस्थित होते. 

या कार्यक्रमासाठी परिसरातील उपस्थित सर्व पशुपालक व शेतकऱ्यांना डॉ. कदम, डॉ. वसुलकर व डॉ. अतुल महाजन यांनी महत्वाचे प्रबोधनपर मार्गदर्शन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प प्रगतीपथावर आहे.

... चौकट ....

समाज प्रबोधनासाठी यु-ट्युबवर लघुपट उपलब्ध

या प्रकल्पाची माहिती व समाज प्रबोधनासाठी एक लघुपट देखील बनवण्यात आला आहे. यु-ट्युबवर https://youtu.be/EBSObtdhkRU (Pandharpuri Pedigree Selection Project) उपलब्ध आहे. 

***

To Top