डॉ. वाघचवरे भावंडाचे मॅरेथॉन रनिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

shivrajya patra

 

सोलापूर :  दक्षिण आफ्रिकेमध्ये  8 जून 2025 रोजी झालेली  90 किलोमीटर कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा सोलापूर च्या डॉ . वाघचवरे भावंडांनी वेळेत पूर्ण करून एक प्रकारचे जागतिक रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे.

1921 पासून दक्षिण आफ्रिकेत डर्बन व पीटर्मॅरीसबर्ग या शहराच्या दरम्यान कॉम्रेड मॅरेथॉन भरवली जाते. या स्पर्धेला अल्टिमेट ह्यूमन रेस असे देखील संबोधले जाते, कारण ही स्पर्धा या दोन शहरांमधील असंख्य, अवघड अशा चढ-उतार असलेल्या टेकड्यांमधून, बारा तासांच्या आत अतिशय प्रतिकूल वातावरणात पूर्ण करावी लागते.

8 जून 2025 रोजी वाघचवरे भावंडांनी म्हणजेच डॉ. स्मिता राहुल झांजुर्णे (डेंटिस्ट बहीण), डॉ. सत्यजित सत्यवान वाघचवरे (डेंटिस्ट भाऊ) व  डॉ. अभिजीत सत्यवान वाघचवरे (ऑर्थोपेडिक सर्जन भाऊ) या तिघा भारतीय भावंडांनी ही स्पर्धा पूर्ण केली. भाऊ- बहिणींनी मिळून ही स्पर्धा पूर्ण करण्याची जगातली ही पहिलीच वेळ होती, हे एक जागतिक रेकॉर्ड आहे. त्यांना याची मान्यता लंडन व दिल्ली स्थित "वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड" या संस्थेने दिली आहे.

"वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड्स" या संस्थेने वाघचवरे भावंडांना एप्रिसिएशन सर्टिफिकेट बरोबरच सुंदर मेडल, आकर्षक ट्रॉफी,  पर्सनलाईज्ड टी-शर्ट ,विशेष शाई पेन व त्यांची मानाची कॅप या गोष्टींचा समावेश आहे.

कॉम्रेड मॅरेथॉनच्या इतिहासात 1921 पासून  यावर्षीच्या 98 व्या स्पर्धेपर्यंत त्यांच्या नोंदीत असे रेकॉर्ड नाही, असा खुलासा कॉम्रेड मॅरेथॉन असोसिएशनचे (CMA) आय. टी. मॅनेजर 'जेराड विल्यम्स' यांनी डॉ. वाघचवरे यांना ई-मेलद्वारे केला आहे. अशा प्रकारच्या जागतिक रेकॉर्डमुळे मॅरेथॉन जगतात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डॉ. वाघचवरे भावंडांच्या या संपूर्ण मॅरेथॉनच्या प्रवासात आई-वडिलांच्या आशीर्वादाबरोबरच  त्यांच्या सहचारिणी डॉ. शुभांगी व डॉ. राजश्री यांचं मोलाचे सहकार्य लाभते.

वाघचवरे बंधूंना कोचिंग मुंबईचे सुप्रसिद्ध मॅरेथॉन पटू सतीश गुजारन, ज्यांनी 14 वेळा ही कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण केली आहे, यांचे लाभले, तर डॉ. स्मिता राहुल झांजुर्णे यांना पुण्याचे योगेश सानप यांचे कोचिंग लाभले.

डॉ वाघचवरे भावंडांनी त्यांना मिळालेले हे यश त्यांनी पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना समर्पित केले. यावेळी डर्बन शहराच्या मुख्य चौकात भारतीय सेनेचा अभिमान असलेला  'मिशन सिंदूर'  चा फलक  झळकावून देशाभिमान जागविला.

To Top