सोलापूर : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सामान्य नागरिकांना शिवीगाळी मारहाण तसेच दमदाटी करून गंभीर दुखापत करणे घातक शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणे जबरदस्तीने पैसे काढून घेणे आणि चोरी घरपोडी सारखे गुन्हे दाखल असलेल्या दुर्गा कृष्णा श्रीराम आणि विराट उर्फ पोपट हुसेन कांबळे या सराईत गुन्हेगारांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलंय.
जुना विडी घरकुल क्षिरालिंग नगरातील रहिवासी दुर्गा कृष्णा श्रीराम (वय-४० वर्षे) याच्याविरुध्द सन २०१६,२०१७,२०२१ व २०२३ या कालावधीमध्ये घातक शस्त्राचा वापर करुन दहशत निर्माण करणे, जबरदस्तीने पैसे काढून घेणे, घरफोडी चोरी करणे यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता.
असाच प्रस्ताव जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडून विराट उर्फ पोपट हुसेनी कांबळे (वय-२५ वर्षे, रा. रमाबाई नगर, बुधवार पेठ, सोलापूर) याच्याविरुध्द पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता. कांबळे याच्याविरूध्द सन २०२३, २०२४ व २०२५ या कालावधीमध्ये मार्केट यार्ड परिसरात व्यापाऱ्यांच्या हालचालीवर लक्ष ठेऊन चोऱ्या करणे, शेतकऱ्यांना दमदाटी मारहाण करुन जबरदस्तीने पैसे काढून घेणे यासारखे गुन्हे दाखल आहेत.
या दोन्ही प्रस्तावावर पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी कार्यवाही करून दुर्गा कृष्णा श्रीराम आणि विराट उर्फ पोपट कांबळे यास सोलापूर व धाराशीव जिल्ह्यान दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. तडीपारीनंतर दुर्गा श्रीराम याला बेळगांव येथे तर विराट उर्फ पोपट कांबळे यास पुणे येथे सोडण्यात आलं आहे.