सोलापूर : सोलापूर भविष्य निर्वाह निधी कार्यालयात येणाऱ्या, खाजगी दलालांवर कारवाई करा, अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा व मागण्यांचे निवेदन मंगळवारी, १० जून रोजी कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली विडी कामगारांच्या शिष्टमंडळाद्वारे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम मीना यांना देण्यात आले.
सोलापूर भविष्य निर्वाह निधी, विभागीय कार्यालयात खाजगी दलालांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. पी. एफ. कार्यालयातील अधिकारी व खाजगी दलालांच्या संघनमताने, गरीब व अशिक्षित महिला विडी कामगारांची आर्थिक फसवणूक करून आर्थिक लूट करत आहेत. यासंबंधी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अनेक वेळा विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. परंतु दलालांचा वावर कमी होतच नाही, याउलट गरीब कामगारांची लूट सुरू असल्याचं निदर्शनास आल्यानं मंगळवारी,१० जून रोजी दलालांना कार्यालयात बंदी न केल्यास आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा देणारं निवेदन देण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्तांनी शिष्टमंडळाबरोबर सुमारे तासभर चर्चा करून, यापुढे दलालांचा बंदोबस्त केला जाईल, असं आश्वासन दिले. तरीही पंधरा दिवसात खाजगी दलालांना बंदी न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा कारमपुरी यांनी दिला.
या कार्यालयात येणाऱ्या सर्व कामगारांना कार्यालयीन कर्मचारी तसेच सुरक्षारक्षक यांच्याकडून योग्य वागणूक देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर, पप्पू शेख, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, राधिका मिठ्ठा, सविता दासरी, राणी दासरी, पद्मा मॅकल, लक्ष्मी गुंटला, शोभा पोला, यांच्यासह विडी कामगार व कामगार सेनेचे पदाधिकारी यांचा समावेश होता.
फोटो ओळ - पीएफ विभागीय कार्यालयात, खाजगी दलालांना बंदी घाला व पीएफ लाभार्थी कामगारांना कार्यालयात चांगली वागणूक द्या, अशा मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त मीना यांना देताना, विष्णू कारमपुरी व विडी कामगार तसेच कामगार सेना पदाधिकारी छायाचित्रात दिसत आहेत.