सोलापूर : शाळेची गुणवत्ता उंचावून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून गावाचे नाव उज्वल होईल. या भावी पिढीला योग्य दिशा देऊन गावाची ओळख निर्माण करता येईल, असं मत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवप्रविष्ट विद्यार्थ्यांचं आमदार देशमुख यांनी स्वागत आणि विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या शालेय साहित्यांचे वितरण केले. या प्रसंगी आमदार देशमुख बोलत होते.

शाळेचा पहिलाच दिवस असल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आगामी शालेय वाटचालीबद्दलचा आनंद आणि उत्सुकता स्पष्टपणे दिसत होती. शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रारंभापासूनच पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, याकरिता शाळेच्या परिसरात या प्रसंगी वृक्षारोपण केले.
यावेळी बाजार समितीचे संचालक राजशेखर शिवदारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चैतन्य माने, मुख्याध्यापक विलासराव देशमुख, सरपंच विनोद बनसोडे, उद्योजक शिवानंद हत्तुरे, चंद्रकांत गुरव, राहुल वंजारे, सागर धुळवे यांच्यासह शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.