... सूचनांचे पालन करुन कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी सर्वांनी करावं सहकार्य : पोलीस आयुक्त एम. राजकुमार

shivrajya patra

सोलापूर : मोहरम उत्सव चे अनुषंगाने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोमवारी, २३ जून रोजी सायंकाळी पोलीस आयुक्त एम राज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत, मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी केले.

पोलीस आयुक्तालयात आयोजित शांतता कमिठीच्या बैठकीस पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, शहर काझी, मुस्लीम धर्मगुरु, मौलाना, शहरातील प्रमुख मस्जिदचे विश्वस्त यांची उपस्थिती होती. बैठकीच्या प्रारंभी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती डॉ. दिपाली काळे यांनी प्रास्ताविक करुन बैठक आयोजन करण्यामागील उद्देश स्पष्ट केला.

मोहरम उत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोणीही, कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने वर्गणी/देणगी मागू नये, सर्व पंजे, सवारी, डोले स्थापन करणाऱ्यांनी आपली नोंदणी धर्मादाय आयुक्त यांच्याकडं करावी, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर मंडप मारताना सार्वजनिक रस्त्याचा २/३ भाग मोकळा सोडावा, पंजे/सवारी संरक्षणाकरीता प्रत्येकांनी आपलेकडील स्वयंसेवक नेमावेत, मोकाट जनावरांपासून पंजे/सवारी यास धोका होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. 

कोणीही विनापरवाना मिरवणूक काढणार नाही, मिरवणूक मार्गावरील धार्मिक स्थळे विशेषतः लहान - मोठी मंदिरासमोर नाच-गाणी करू नयेत, अथवा मंदिरांवर आक्षेपार्ह चिज-वस्तू फेकू नये, नागरिकांनी कोणत्याही स्थितीत चुकीच्या अफवांवर विश्वास न ठेवता सामंजस्याने वागावे. मोहरम साजरा करतेवेळी दहा दिवस ठिक-ठिकाणी सरबत वाटप करतात. सरबत वाटप करताना सार्वजनिक रस्त्यावर अडथळा होऊ नये, याची खबरदारी घ्यावी असंही यावेळी सुचित करण्यात आले.

सोशल मिडीयाद्वारे कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, व्हिडीओ फॉरवर्ड न करता ते डिलीट करुन जातीय सलोखा अबाधित राखावा. एखादी अप्रिय अथवा चुकीची घटना आजूबाजूला घडत असल्यास स्थानिक पोलीस ठाणे किंवा नियंत्रण कक्ष येथे त्वरीत माहिती द्यावी. कोणत्याही धार्मिक स्थळी आक्षेपार्ह भाष्य अथवा वक्तव्य केले जाणार नाही, याची संबंधितांनी खबरदारी घ्यावी. या सुचनांचे पालन करुन कायदा व सुव्यवस्था राखणेकामी सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन या बैठकीत करण्यात आलं.

त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य आणि इतरांनी समस्या सुचना मांडल्या. त्यानंतर त्या सुचनेचे संबंधित महानगर पालिका अधिकारी यांनी त्या कामाची रुपरेषा बघून समस्या सोडविण्यात येतील, असे सांगितले.

पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी बैठकीस उपस्थित लोकांचे स्वागत करुन मांडलेल्या अडी-अडचणीचे निरसण केले. उत्सव साजरा करताना बऱ्याचवेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते, कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, शांतता समिती सदस्य व नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायेदशीर बाबींची माहिती पोलीसांना दिली पाहिजे. नियमांचे पालन करावे, तसेच आषाढी एकादशी व मोहरम एका दिवशी असल्याने एकमेकांच्या भावनांचा आदर करून उत्सव शांततेत पार पाडावा, असं आवाहन करून मोहरम उत्सवानिमित्त शुभेच्छा देऊन बैठकीला उपस्थितांचे आभार मानले.

या बैठकीस पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अजित बोऱ्हाडे, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-१) प्रताप पोमण, वाहतुक शाखा अतिरिक्त कार्यभार (विभाग-२) सुधिर खिरडकर, (गुन्हे शाखा) राजन माने, नियंत्रण कक्ष, तसेच सोलापूर महानगरपालिका सागर खरोसेकर, महावितरण अति. कार्यकारी अभियंता प्रदिप मोरे, धर्मादाय कार्यालयाकडील असिफ शेख, अग्निशामक दलकडील समीर पाटील, म. प्र. नि. मंडळ सोलापूरकडील किरण चव्हाण, आर. टी. ओ. कडील अधिकारी, सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार, शांतता कमिटीचे सदस्य, आणि प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

To Top