सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने केंद्र सरकारच्या मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या आकृती केंद्राशी सामंजस्य करार केला असून यामुळे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना भाभा अणुसंशोधन केंद्राने विकसित केलेल्या दोनशेहून अधिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर येथील विद्यार्थ्यांना अणुसंशोधन केंद्रामध्ये प्रकल्प करण्याबरोबरच प्रशिक्षणही मिळणार आहे.
या करारावर दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांच्या प्रमुख उपस्थितीत कराराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या वैज्ञानिक अधिकारी तथा आकृती ग्रुपच्या लीडर भारती भालेराव, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, डॉ. अंजना लावंड आदी उपस्थित होते.
अन्न, कृषी, पाणी, औषधे, अभियांत्रिकी आदी क्षेत्राशी संलग्न समाजोपयोगी 200 हून अधिक तंत्रज्ञान भाभा अनुसंशोधन केंद्राने विकसित केले आहेत. या विकसित तंत्रज्ञानाचा वापर व उपयोग आता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना करता येणार आहे. या तंत्रज्ञानाचा अभ्यास देखील विद्यार्थ्यांना करता येणार आहे. पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विविध प्रोजेक्ट, ट्रेनिंग तसेच व्यवसायासाठी परवानगी देखील भाभा अनुसंशोधन केंद्राकडून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या कराराचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार असल्याचे प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा सांगितले.
फोटो ओळी:
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा केंद्र सरकारच्या भाभा अणुसंशोधन केंद्राशी सामंजस्य करार झाला. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, भाभा अणुसंशोधन केंद्राच्या वैज्ञानिक अधिकारी भारती भालेराव, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, डॉ. अंजना लावंड छायाचित्रात दिसत आहेत.