उत्तर सोलापूर : नान्नज येथील रहिवाशी व सांप्रदायिक क्षेत्रातील व महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. मधुकर गोविंद गिरी महाराज यांचं शुक्रवारी, १६ मे रोजी सकाळी निधन झाले. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास नान्नज स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या काही महिन्यापासून गिरी हे मधुमेह आजाराने त्रस्त होते, सोमवारी सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले होते, त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालावली. ते मृत्यूसमयी ७५ वर्षांचे होते.
सन १९७६ सालापासून ते नान्नज ग्रामपंचायत कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत होते. सन २००२ साली लिपिक पदाच्या नोकरीचा राजीनामा देत किर्तन सेवेला सुरुवात केली होती. यु-ट्यूबसह सोशल मीडियावर गिरी महाराज यांची आणि कीर्तने गाजली आहेत, तर मराठी वहिनी वरील झी टॉकीज वाहिनी, सन मराठी, मी मराठी, व मन मंदिर यासह इतरही मराठी वाहिन्यावर गिरी महाराज यांची कीर्तने प्रसारित झाली आहेत. सांप्रदायिक क्षेत्रातील महाराष्ट्रातील विनोदाचार्य कीर्तनकार म्हणून ह. भ. प. मधुकर गिरी महाराज यांची ओळख होती.
गेली ३५ ते ४० वर्षापासून ते सांप्रदायिक क्षेत्रात कीर्तन सेवेतून समाज प्रबोधन सेवा केली आहे. शुक्रवारी चार वाजण्याच्या सुमारास नान्नज स्मशानभूमीत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी सांप्रदायिक क्षेत्रातील व्यक्ती व इतर हजारो नागरिक सहभागी झाले होते.
महाराष्ट्रातील अनेक गावात गिरी महाराज यांनी कीर्तन सेवा बजावली तर इतरही राज्यात त्यांनी कीर्तन सेवा केली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ,भावजय, दोन बहिण, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे, भाचे असा परिवार आहे.
