ओरिएण्टल विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांचं बोंबाबोंब आंदोलन

shivrajya patra

सोलापूर : शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे दरवर्षी ओरिएण्टल विमा कंपनी स्थापनेपासून लुबाडत आलेली असल्यामुळे शुक्रवारी,16 मे रोजी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली येथील ओरिएण्टल विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले. 

सोलापूर जिल्हा विम्यातून वगळण्यात आला होता, परंतु मागील काही दिवसापासून आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे समजताच शेतकऱ्यांना कमी प्रमाणात विमा भरपाई वाटप करण्यात आली तर अनेक शेतकरी अजूनही वंचित आहेत. 

त्यामुळे आठवड्यात शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे खात्यावर जमा न केल्यास संबंधित राज्यस्तरीय शासकीय व विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा शंकर गायकवाड यांनी यावेळी दिला. 

सोलापूर ओरिएण्टल विमा कंपनीचे व्यवस्थापक गिरीश चितारी यांनी आंदोलकांना पुणे येथील पिक विमा विभागाचे राज्याचे प्रमुख विनायक दीक्षित यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधत, खरंच आठवड्यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर सोडण्याचे आश्वासन मिळाल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष महादेव शिंदे, शहाजी शिंदे, सचिन आगलावे, बालाजी यादव, संदीप राठोड, विष्णु शिंदे, लक्ष्मण शिंदे, भागवत डांगे, अण्णा डांगे, प्रकाश तोडकर, समाधान शिंदे, सुभाष तोडकर, दिनेश शिंदे, करण पाटील, रमेश शिंदे आदींसह बहुसंख्य शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. 

फोटो ओळी: शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्यासह अन्य शेतकरी बोंबाबोंब आंदोलन करताना छायाचित्रात दिसत आहेत.

To Top