सोलापूर : २,५०,००० रुपयांचे बिल काढून देण्यासाठी ५,००० रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्या प्रकरणी लोकसेवक शंकर काशीनाथ कवठे या वरिष्ठ लिपीकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात बुधवारी, २८ मे रोजी घडला. याप्रकरणी आरोपी शंकर कवठे याच्याविरूध्द सदर बझारर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलंय.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता कार्यालयातील वरिष्ठ लिपिक शंकर कवठे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे हत्तूर येथील चर्मकार वस्तीत तक्रारदारानं भूमिगत गटार व सिमेंट रस्ता करणे असं केलेल्या कामाच्या ४,२४,७५९ रुपये बिलापैकी २,५०,००० रुपयांचे बिल काढून देण्यासाठी शंकर कवठे यांनी तक्रारदार यांच्याकडे साहेबांच्या नावाने ५, ००० रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
त्यावरून आलेल्या तक्रारीची पडताळणी करून ५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्या प्रकरणी वरिष्ठ लिपिक शंकर कवठे याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७, ७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा सांगण्यात आलंय.
या कारवाईत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (ला.प्र.वि.पुणे), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे (ला.प्र.वि. पुणे) यांनी मार्गदर्शन अधिकारी म्हणून काम पाहिले.
नागरिकांना आवाहन ...
भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना करण्यात आलं आहे.
संपर्क पत्ता : पोलीस उपअधिक्षक, लाचलुचतपत प्रतिबंधक विभाग, रंगभवन चौक, सोलापूर ४१३४०३.
संकेत स्थळ : acbmaharashtra.gov.in
ई-मेल : dyspacbsolapur@gmail.com
ऑनलाईन तक्रार अॅप : acbmaharashtra.net
टोल फ्री क्रमांक : १०६४
दूरध्वनी क्रमांक : ०२१७-२३१२६६८
