बोगस बी-बियाणे, नकली रासायनिक खते विक्री करणाऱ्यांवर व्हावी कठोर कारवाई : राष्ट्रीय किसान मोर्चा

shivrajya patra

पीडित शेतकऱ्यांची कृषी विभागाला आर्त हाक

भंडारा : जिल्ह्यासोबत राज्यातील अनेक कृषी केंद्रात सर्रासपणे बोगस बी बियाणे आणि नकली रासायनिक खतांचा विक्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात राजरोसपणे चालू असल्याने बळीराजा शेतकऱ्याची फसवणूक केली जात आहे, यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक, मानसिक आणि सामाजिक भार सहन करावा लागतोय, याला आळा घालण्यासाठी बोगस बी बियाणे आणि नकली रासायनिक खतांचा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी बळीराजा आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलीय.

आता सुरू होणाऱ्या खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकरी बी- बियाणे, रासायनिक खते खरेदीसाठी परिसरात जवळपास असलेल्या कृषी केंद्रात धाव घेतो, मात्र त्यांच्या भोळेपणाचा आणि अज्ञानाचा गैरफायदा अनेक कृषी केंद्र घेतांना दिसतात. अनेक कृषी केंद्र चालक राज्यात प्रतिबंधित असलेल्या, बी बियाणे, रासायनिक खते , राज्याला लागून असलेल्या अन्य राज्यातील बोगस सोयाबीन, कापूस, धान आणि अन्य बी बियाणे, रासायनिक खते आणून, राज्यात चढ्या भावाने विकून शेतकरी लोकांची फसवणूक आणि लुबाडणूक करीत असल्याचं नेहमीचं घडतंय.

दरवर्षी बियाणे-खते यांच्या किंमती वाढतच आहेत, मात्र हमीभाव उलट कमी होतांना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यास कर्ज घेऊन पिकांची लागवड करण्याला पर्याय उरत नाही. त्यातही काही शेतकऱ्यांचं उगवतं, मात्र कृषि केंद्रातील बी-बियाणे लागवडीनंतर बऱ्याचदा उगवणीतच निराशा होते. त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, याला जबाबदार कोण असा राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हा प्रभारी अभय डी. रंगारी यांचा सवाल आहे.

कृषि केंद्र, विमा कंपन्या, कर्ज देणाऱ्या बँका,  कृषी विभाग की झोपेचे सोंग घेतलेले सरकार, असा प्रश्न शेतकरी लोकांना निर्माण झाला आहे. याकडे संबंधित विभाग, शेतकरी संघटना, निवडणुकीत ' मीच शेतकऱ्यांचा नेता ' म्हणून मोठं मोठे बॅनर लावणारे स्वयंघोषित नेते लक्ष देतील काय की फक्त थळीवरून बोंबा मारतील, असा प्रतिप्रश्न शेतकरी एकमेकांना विचारत आहेत.

कृषि विभागाने बाजारात विक्रीस उपलब्ध असलेली बी-बियाणे गोळा करणे, तपासण्या करून संबंधित अहवाल त्या-त्या कृषी केंद्रात  दर्शनीय भागात लावण्यासाठी केंद्राला बंधनकारक करायला पाहिजे. परिसरात भरारी पथक नेमून भेटी देणे, तपासण्या करणे, नमुना गोळा करणे, प्रयोगशाळेत पाठविण्याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचं आहे.

शेतकरी लोकांनी सुद्धा कृषि केंद्राच्या बी-बियाणे, खते यावर अवलंबून न राहता स्वतःच बी-बियाणे निर्माण करून, साठवणूक करून घरचेच बी-बियाणे वापरावं. जैविक खते, गांडूळखत, सोनखत इत्यादींचा वापर करून कृषि केंद्रावर अवलंबून राहू नये, असंही अभय रंगारी यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना आवाहन ...

शेतकऱ्यांनी संघटित होऊन गैरप्रकार आणि बोगसगिरीच्या फसवणुकीविरुद्ध आवाज बुलंद केला पाहिजे, यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चा सदैव शेतकऱ्यांना मार्गदर्शन, कायदेशीर बाबीसंबंधी सहकार्य, आंदोलन, गल्लीपासून-दिल्लीपर्यंत सदैव तत्परतेने सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन राष्ट्रीय किसान मोर्चा चे भंडारा जिल्हा प्रभारी अभय रंगारी यांनी केलं आहे. तरी काही समस्या असल्यास संबंधित जिल्ह्यातील राष्ट्रीय किसान मोर्चा च्या कार्यालयात संपर्क साधला, असंही त्यांनी म्हटलंय.

To Top