सोलापूर: श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट तर्फे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या हस्ते सोलापूर चे सुपुत्र व महाराष्ट्राचे गायक विजेते मोहम्मद अयाज यांचा सन्मान करण्यात आला.
अक्कलकोट नरेश विजयसिंह राजे भोसले महाप्रवेशद्वार उद्घाटन सोहळा रविवारी, १८ मे रोजी पार पडला. या भव्य सोहळ्यात मोहम्मद अयाज यांचा सुर-सरगम संगीत संध्या हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भावगीते, भक्ती-गीते, लोकगीते तसेच भारतरत्न लता मंगेशकर व मोहम्मद रफी यांची अविट गाणी मोहम्मद अयाज व सह कलाकारांनी सादर केली.
या कार्यक्रमास माजी गृह राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, अमोल भोसले, अन्नछत्र मंडळ चे उपाध्यक्ष अजय खोबरे, चेतन नरोटे, शहाजी पवार, अशपाक अल्लोळी , वटवृक्ष चे प्रथमेश इंगळे यांच्यासह हजारों रसिक श्रोते उपस्थित होते.
अन्नछत्र मंडळ चे अध्यक्ष जन्मेजय भोसले हे एक कलाप्रेमी संगीत जाणकार असून अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट येथील सांस्कृतिक कार्यक्रमास दरवर्षी अनेक कलावंत आपली सेवाभाव प्रस्तुत करतात. तसेच लता मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा भोसले, पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर या संपुर्ण परिवारासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.
आज मला अत्यंत आंनद होत आहे, आपण मला सेवेची संधी दिलात व माझा सन्मान देखील केलात, त्याबद्दल मी सदैव आपल्या परिवाराचा ऋणी आहे, अशी भावना मोहम्मद अयाज यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.
छायाचित्र : माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे महागायक विजेते मोहम्मद अयाज यांच्यासह अन्य मान्यवर दिसत आहेत.