लातूर : जिल्ह्यातील लातूर-तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे भीषण अपघाताची घटना घडली. त्यामध्ये, माजी आमदार आर. टी. देशमुख यांचं निधन झाले. पावसामुळे महामार्गावर साचलेले पाणी उडून काचेवर आल्यामुळे माजी आमदार देशमुख यांची गाडी स्लिप होऊन ही भीषण दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती पुढं आलीय.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील बेलकुंड उड्डाणपूलावरुन जात असताना गाडी स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडून चार वेळेस पलटी झाली. या घटनेत गाडीतील वाहनचालक सुदैवाने बचावला असून त्यास किरकोळ दुखापत झाल्याचं सांगण्यात आलंय. महामार्गावर साचलेले पाणी उडून काचेवर आल्यामुळे चालकास काही दिसले नाही. त्यामुळे, चालकाने वेगात ब्रेक लावले, तेव्हा गाडी जागेवरच स्लिप झाली.
चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने गाडीने चार पलट्या खाल्ल्या, देशमुख यांना गंभीर जखमी अवस्थेत लातूरला नेताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं, पण तपासणीनंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं, असं सांगण्यात आलंय.
2014 मध्ये परळी तालुक्याचे भूमिपुत्र आर.टी. देशमुख यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत माजलगाव मतदारसंघातून ते विजयी झाले होते.
