स्वतःच्या हक्काच्या नोकऱ्या मिळण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहा : शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे

shivrajya patra

भटक्या विमुक्त समाज व पारधी समाज बांधवांनी दिलेल्या मागण्यांचे निवेदनावर अनमोल मार्गदर्शन

सोलापूर : शिक्षणाला महत्त्व द्या. शासकीय नोकऱ्यातील स्वतःच्या समाजासाठी जागा कुठे रिक्त आहेत, यासाठी सदैव जागृत रहा.  स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतः सक्षम व्हा, स्वतःच्या हक्काच्या नोकऱ्या मिळण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहा, असं अतिशय अनमोल मार्गदर्शन शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे  यांनी त्यांच्या भेटीस आलेल्या भटक्या विमुक्त समाज व पारधी समाज बांधवांनी केले.

धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील भटक्या विमुक्त समाजातील व पारधी समाजातील प्रतिनिधी यांनी महिलांसह बहुसंख्येने सोलापूर येथील शिवसेना शहर व जिल्हा संपर्क कार्यालय येथे येऊन शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांची समक्ष भेट घेऊन त्यांच्या दैनंदिन जीवनातील गंभीर प्रश्न व समस्या अत्यंत पोटतीडकेने मांडल्या. 

घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही, समाजासाठी शासनाने ज्या काही लाभार्थी योजना जाहीर केलेल्या आहेत, त्यापासून ते अनेक वर्षापासून वंचित आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेकांनी बचत गट, गायरान जमीन, गायरान जमीन ज्या कब्जे वहिवाटीत आहेत, त्यावर वारसा हक्काने पुढे नावे लावण्यामध्ये येणाऱ्या अडचणी असे एक ना अनेक गंभीर प्रश्न व समस्या अमोल शिंदे यांच्या समक्ष मांडल्या.

यावेळी उपस्थित असलेल्या दोन्ही समाज बांधवांना प्रथम आपल्या सर्व दैनंदिन समस्या व प्रश्न यांची सोडवणूक करावयाची असेल तर सर्व प्रथम समाजाचे संघटन मजबूत करा, असंही शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही समाजाच्या प्रश्नाबाबत राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना समाज बांधवांच्या न्याय हक्काच्या मागण्यांचं निवेदन सादर करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी भटक्या विमुक्त समाजाचे धाराशिव व पंढरपूर चे प्रतिनिधी अनेक समाज बांधव, महिला-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

To Top