मुलांना संस्कारक्षम विचारांची शिदोरी देणारा कवयित्री महेमूदा शेख यांचा बालकाव्यसंग्रह "गुलपरी"

shivrajya patra

  मुलांच्या सानिध्यात आलेल्या लेखक आणि कवीला बाल कविता लिहिण्याचा मोह आवरता येत नाही. गझल, कविता आणि गायन विश्वात कमी कालावधीत लौकिक मिळवलेल्या कवयित्री महेमूदा रसूल शेख यांचे ‘गुलपरी’ बालकाव्यसंग्रह, ‘लाजवंती’ आणि ‘काव्यलतिका’ असे एकूण तीन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत.

‘गुलपरी’ या काव्यसंग्रहाबद्दल बोलायचे झाल्यास, या काव्यसंग्रहाचे नाव कवयित्री महेमूदा यांनी आपल्या वडिलांच्या नावावरून दिले आहे. त्यांचे वडील ‘गुलाबराव’ यातील ‘गुल’ आणि त्यांच्या परीसमान असलेल्या महेमूदाजी यांच्यावरून ‘गुलपरी’ असे नाव देण्यात आले आहे. 

हे नाव लहान मुलांच्या मनाला भुरळ घालणारे आहे, तसेच या काव्यसंग्रहातील कविता देखील तशाच मनमोहक आहेत. काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अत्यंत रेखीव आहे. एल. पी. क्रीशन यांनी साकारलेल्या चित्रात ढगातून पडणारा पाऊस आणि मित्र-मैत्रिणी छत्री घेऊन चालत असल्याचे दृश्य अत्यंत सुंदरपणे टिपले आहे. 

‘ललित कला साहित्य मंच’ चे राष्ट्रीय अध्यक्ष ललित कोलते यांनी अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद प्रस्तावना लिहिली आहे. ललितजी म्हणतात, ‘गुलपरी’ या काव्यसंग्रहातील कविता मुलांसाठी अतिशय चांगल्या आणि संस्कारक्षम आहेत. तसेच, पुस्तकाच्या मलपृष्ठावर महेमूदाजींचा साहित्यिक प्रवास नमूद केला आहे.

बालकाव्य लिहिणे, ही एक तारेवरची कसरत असते. ही कसरत करताना साहित्यिकाला लहान मुलांबरोबर लहान व्हावे लागते. मुलांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन, त्यांना मनोरंजनासोबत संस्कारही मिळावेत, याचा विचार करावा लागतो. कवयित्री महेमूदा जी यांनी या सगळ्याचा विचार करून बालकविता रचल्या आणि त्या कसोटीवर खऱ्या उतरल्या आहेत.

मुलांना मनोरंजनासोबतच खऱ्या-खोट्यांचे, नैतिकतेचे, आरोग्याचे आणि भावनिक जाणीवेचे शिक्षण मिळावे, यासाठी कवयित्री महेमूदा जींनी आपल्या कवितांद्वारे आपले योगदान दिले आहे. त्यामुळे त्या एक सक्षम बालसाहित्यिका ठरल्या आहेत. 

या काव्यसंग्रहात एकूण ७५ कविता आहेत. या कविता लहान मुलांना आवडणाऱ्या ठरतीलच, पण त्यासोबत प्रौढांच्या मनालाही भावतील.या काव्यसंग्रहास अनेक मान्यवरांचे शुभेच्छा संदेश मिळाले आहेत, जे या काव्यसंग्रहाची प्रतिष्ठा अधिक उंचावतात.

गुलपरी या काव्यसंग्रहातील पहिलीच कविता मनाला भावणारी आहे. बाबा हे प्रत्येकाच्या आयुष्यात विशेष स्थान राखतात. त्यांच्या रागाची झलक सर्वांना सहज दिसते, पण त्यांचे प्रेम आणि अंतःकरणातील वेदना फारच कमी लेखकांनी शब्दबद्ध केल्या आहेत. कवयित्री महेमूदा शेख यांनी हे वास्तव जाणून, बाबांचे चित्रण आपल्या कवितेत प्रभावीपणे साकारले आहे.बाबांविषयी लिहिताना कवयित्री महेमूदा शेख म्हणतात—

                  "बाबा म्हणजे काय  

                  सांगेल का हो कोणी  

                  डोक्यावर वाहतो जो  

                  सगळ्या दुःखाची गोणी"

बाबा जे कष्ट करतात, घराचा गाडा सांभाळतात, सर्वांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटतात—या त्यांच्या समर्पणाचे सुंदर चित्रण कवयित्री महेमूदा शेख यांनी आपल्या कवितेत रेखाटले आहे. ही कविता वाचताना प्रत्येकाला त्यांच्या बाबांची आठवण निश्चितच येईल!कवयित्री महेमूदाजींच्या कविता केवळ मुलांचे मनोरंजन करत नाहीत, तर त्यांच्यात नात्यांच्या गोडव्याची आणि भावनांच्या संवेदनशीलतेची बीजं रोवतात. 

"आई बाबांचे प्रेम", "आईची इच्छा", "नातं बहीण भावाचं", आणि "प्रिय बाबा"अशा कवितांमधून मुलांना प्रेम, आपुलकी, नात्यांचे महत्त्व आणि त्यातील हळुवारपणा समजावून देण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. त्यांच्या "नदी म्हणे" आणि "पालखी प्रेमाची" या कवितांमधून निसर्गाच्या सौंदर्याबरोबर जीवनाच्या प्रवाहाचे आणि संस्कृतीच्या वारसाचे अनोखे दर्शन घडते. 

"बालपण"ही कविता तर लहानपणीच्या निरागस आठवणींना पुन्हा जागवत, प्रत्येक वाचकाला हसवते आणि भावूकही करते.अशा सर्व कविता लहानग्यांच्या भावविश्वात आपले स्थान निर्माण करून, त्यांना नात्यांचे आणि जीवनाचे मूल्य शिकवतात. त्यामुळे हा काव्यसंग्रह फक्त वाचनाचा आनंदच देत नाही तर मुलांना संस्कारक्षम विचारांची शिदोरीही देतो.

कवयित्री महेमूदा शेख यांच्या या कवितांमधून मुलांच्या शाळेशी असलेल्या भावनिक नात्याचा अत्यंत संवेदनशील आणि सुंदर असा वेध घेतलेला दिसतो. "शाळा" आणि "शाळेचा पहिला दिवस" या कवितांमध्ये शाळेच्या गोड आठवणी, शिकण्याचा आनंद आणि मित्र-मैत्रिणींच्या सहवासातील उत्साहाचे चित्रण करण्यात आले आहे. 

"बाराखडी" आणि "मी शाळकरी" या कवितांमधून शिक्षणाचे महत्त्व आणि लहान वयातील बालसुलभ गमती-जमती सहज भाषेत मांडल्या आहेत. तर "ओढ शाळेची" ही कविता मुलांच्या शाळेबद्दलच्या प्रेमभावनेचा आणि उत्सुकतेचा सुंदर भावस्पर्शी अनुभव देते.

या कवितांमधून प्रत्येक मुलाच्या मनातील शाळेचे स्थान, शिकण्याची ओढ आणि शाळेच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा मिळतो. त्यामुळे हा काव्यसंग्रह केवळ वाचनाचा आनंद देणारा नसून, बालपणाच्या आठवणींना पुनःप्रत्यय देणारा ठरतो. 

कवयित्री महेमूदा शेख यांच्या कवितांमध्ये ग्रामीण जीवनाचे अनोखे चित्रण दिसून येते. "मोट," "बागेची शोभा," "नदी म्हणे," "झुंजूमुंजू," "हरवली चूल," "हरवलं बालपण," "धनगरवाडा," आणि "सोनेरी पहाट" या कवितांमधून त्यांनी ग्रामीण संस्कृतीतील लुप्त होत चाललेल्या गोष्टी मुलांना सहज समजावून सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. 

त्यांच्या "मोट" कवितेतून एका काळातील जीवनशैलीची आठवण होते. मोट ही विहिरीतून पाणी काढण्यासाठी वापरण्यात येणारी पारंपरिक यंत्रणा होती, जी आता दुर्मीळ झाली आहे. मुलांना या मोटची कल्पना सहज समजावी, म्हणून कवयित्रींनी अत्यंत साध्या आणि प्रभावी शब्दांत तिचे चित्रण केले आहे. 

त्याचबरोबर "२०२० बाय बाय," "नवा पाहुणा," आणि "सांग सांग कोरोना" या कविता त्या विशिष्ट कालावधीशी संबंधित आहेत. त्या कवितांमधून त्या काळातील भावना आणि परिस्थितीचे प्रतिबिंब उमटते, ज्या कालांतराने फिकट होत जातील. कवयित्री महेमूदा शेख यांच्या काव्यसंग्रहात पारंपरिक ग्रामीण जीवन आणि समकालीन परिस्थितीचा सुंदर संगम दिसतो, जो वाचकांना भूतकाळाची आठवण करून देतो आणि त्यातून शिकण्यास प्रवृत्त करतो.

कवयित्री महेमूदा शेख यांनी आपल्या कवितांमधून शिक्षण आणि मनोरंजनाचा सुंदर मिलाफ साधला आहे. "खेळ," "दिशा," "सूर्यमाला," "अंकगणित," "भारतातील नद्या," "पक्ष्यांची शाळा," "बाराखडी," "मासे," "फणसाचे झाड," "जंगल दरबार," "जंगल सफर," "आकाशीचा चंद्र," "वसंत ऋतू," "फुलपाखरू," आणि "फुलांचा सन्मान" या कवितांमधून त्यांनी मुलांना विविध शैक्षणिक संकल्पना सहज आणि सुलभतेने समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांच्या लेखनशैलीत साधेपणा आणि सहजता दिसून येते, जेणेकरून बालवाचकांना सहज कळेल आणि त्यांना कविता पाठ करण्यास गोडी वाटेल. "बाराखडी" या कवितेत त्यांनी मुलांना मराठी वर्णमालेची ओळख मनोरंजनाच्या माध्यमातून करून दिली आहे. 

"सूर्यमाला" आणि "भारतातील नद्या" या कवितांमधून निसर्गविज्ञान आणि भूगोल यांचा परिचय मिळतो, तर "अंकगणित" मधून गणिताची मूलतत्त्वे समजावून देण्याचा प्रयत्न आहे. "पक्ष्यांची शाळा" आणि "जंगल सफर" या कवितांमधून प्राणी आणि पक्ष्यांचे जग मुलांना अधिक जवळचे वाटते. 

"बाराखडी" या कवितेत लिहितात, 

"या बाळांनो या रे या बाराखडीची किमया पहा, अ ने म्हणू या अननस आंबट गोड त्याचा रस" कवयित्री महेमूदा शेख यांनी आपल्या कवितांमधून मुलांच्या भावविश्वाचा सुंदर वेध घेतला आहे."देवा रे देवा," "भोपळ्याची निवडणूक," "विदुषक," "तहान," "पाणी," "लाडकी बाहुली," "विमानाची नवलाई," "देवबाप्पा," "परी," आणि "बाहुलीचं लगीन" या कवितांमधून त्यांनी मुलांच्या मानसिकतेप्रमाणे स्वतः लहान होऊन त्यांच्या दृष्टीकोनातून विचार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.  

"बाहुलीचं लगीन" या कवितेतून त्यांनी मुलांच्या सहजतेने होणाऱ्या आनंदोत्सवाचे आणि त्यांच्या कल्पनाशक्तीच्या रम्य विश्वाचे चित्रण केले आहे. या कवितेत त्या लिहितात             

               "माझ्या बाहुलीचं लगीन 

                 मांडव पडला गं दारी

                 सुरु झाला लगीन सोहळा 

                 आमंत्रण दिले घरोघरी "

बालपणातील प्रत्येक उत्सव, छोट्या गोष्टींमध्ये असलेला आनंद आणि आपुलकीचे संस्कार ही कविता प्रभावीपणे व्यक्त करते.  

तसेच,"वंशाचा दिवा," "गर्भयातना," "मर्मबंद," आणि "सखे शेजारी" या कवितांमधून मुलांमध्ये सामाजिक जाणीव रुजवण्याचा, त्यांना सामाजिक प्रश्नांची संवेदना निर्माण करण्याचा एक सुंदर प्रयत्न दिसून येतो. विशेषतः "वंशाचा दिवा" ही कविता मुलगी आणि मुलगा यांच्यात भेदभाव न करता समानतेचा संदेश देते, जो बालमनावर सकारात्मक प्रभाव टाकतो. याकवितेत त्या लिहितात 

               "मुलगा हवा मुलगा हवा 

                करू नका त्रागा 

                मुलगीही फुलविते 

                आयुष्याच्या बागा"

या कवितांमधून केवळ मनोरंजनच नव्हे, तर शिक्षण, संस्कार आणि समाजातील महत्त्वाचे विषय यांची सहज ओळख मुलांना करून दिली जाते. त्यामुळे महेमूदा शेख यांचा हा काव्यसंग्रह बालवाचकांसाठी प्रेरणादायी ठरतो.

"माझा देश" या कवितेतून त्यांनी बालवाचकांमध्ये देशभक्तीची आणि भारताबद्दलच्या अभिमानाची भावना रुजवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांच्या लेखनशैलीतील साधेपणा आणि प्रामाणिकपणा मुलांच्या भावविश्वाशी सहज जुळणारा आहे. "माझा देश" या कवितेत कवयित्री महेमूदा शेख लिहितात 

                 "माझा भारत देश महान

                   म्हणे त्याला कृषीप्रधान 

                   नसे अन्नधान्यचा तोटा 

                   मोठमोठ्या बाजारपेठा"

त्यांनी विविध काव्यप्रकारांचा प्रभावी वापर करत मराठी साहित्यविश्वात एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. 

कवयित्री महेमूदा शेख यांचा "गुलपरी " हा संग्रह केवळ मुलांसाठीच नव्हे, तर प्रौढ वाचकांसाठीही तितकाच आकर्षक आणि विचारप्रवर्तक आहे.  मुस्लिम मराठी साहित्यात बालसाहित्याची निर्मिती फारच कमी प्रमाणात झाल्याने, "गुलपरी" संग्रह हा त्या साहित्याला एक नवा आयाम देतो, हे निश्चित! कवयित्री महेमूदा शेख यांचा हा प्रवास असाच यशस्वी राहो, आणि त्यांच्या लेखणीमुळे वाचनसंस्कृतीला नवसंजीवनी मिळो, हीच सदिच्छा! 

.................

परीक्षण/समीक्षण  : खाजा बागवान, सोलापूर 

पुस्तकाचे नाव : “गुलपरी"

लेखिका, कवयित्री : महेमूदा शेख 

प्रकाशक : ललित पब्लिकेशन 

प्रकाशन वर्ष :१२ जुलै २०२३

एकूण पृष्ठसंख्या : १०२

वाड्मय प्रकार : बालकाव्यसंग्रह 

मूल्य : १२० रुपये

.... .... ..........

To Top