सोलापूर : फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील कासिम ऊर्फ सोहेल शफीक शेख, (वय-२८ वर्षे, रा. ९२, मुल्ला बाबा टेकडी, सिध्देश्वर पेठ, सोलापूर) हा तडीपारी आदेशाचा भंग करून सोलापुरात वास्तव्यास असल्याने त्यास एमपीडीए अन्वये स्थानबध्द करण्यात आलंय.
त्याच्याविरुध्द गंभीर स्वरुपाचे एकुण ०८ गुन्हे सोलापुरात दाखल आहेत. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. कासिम ऊर्फ सोहेल शफीक शेख याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापुर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असून, त्याच्याविरुध्द सामान्य नागरीक उघडपणे माहीती देत नाहीत, असं पोलीसांचं म्हणणे आहे.
कासिम ऊर्फ सोहेल शफीक शेख यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०२२ व सन २०२५ मध्ये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही त्याच्या वर्तनात बदल झाला नाही. त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी १५ मे रोजी त्याच्याविरुध्द स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, त्यास १६ मे रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.