Type Here to Get Search Results !

वसंत विहारात अख्ख्या कुटुंबाला गोळ्या घालून मारण्याच्या धमकीचे आवाज; दोघांविरूध्द गुन्हा दाखल

सोलापूर : मुलीस रागावून गालावर चापट मारल्यासंबंधी विचारणा केल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचं पर्यवसान गोळ्या घालून मारण्याच्या धमकीत झालंय. ही घटना संकेत थोबडे नगरात पोलीसांची वसाहत असा लौकिक असलेल्या वसंत विहारमध्ये शुक्रवारी रात्री २०.४५ वा. च्या सुमारास घडली. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रविराज मोरेसह दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, वसंत विहारमधील रहिवासी संदीप संभाजी दराडे व मेव्हणा प्रशांत घुगे त्यांच्या घरात असताना घराबाहेर मुलगी श्रावणीच्या रडण्याचे आवाज आला. त्यावेळी शेजारी मोरे यांच्या घरात राहणाऱ्या महिलेने, 'तुझ्या मुलीला तु सांगायचे सोडून तू आमच्याशी वाद करतो का ? तुझ्या आईला आणि तुझ्या मुलीला बघेन' असं म्हणून घाण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पाळीव कुत्र्याच्या पाठीवरून हात फिरवल्यावर हवेत उडणाऱ्या केसाच्या कारणावरुन बाचाबाचीस प्रारंभ झाला होता, असं सांगण्यात आलंय.

तेव्हा संदीप दराडे, शिवीगाळ करू नका, असे म्हणत असताना रविराज मोरे यांनी संदीपची गच्ची पकडून त्यास रस्त्यावर पाडले. त्यावेळी रस्त्यावर पडलेला दगड हातात घेऊन कपाळावर मारून जखमी केले. त्यावेळी फिर्यादीचा मेव्हणा प्रशांत घुगे यांनी सोडवा-सोडवी केली असता, पुन्हा रविराज मोरे यांनी कमरेचे बेल्टने फिर्यादीस मारहाण करून शिवीगाळ करून, 'कुंटुंबातील तुम्हा सर्वांना गोळ्या घालून मारून टाकेन ' अशी धमकी दिली. 

याप्रकरणी संदीप संभाजी दराडे (वय-४० वर्षे, रा-घर नं. ४०, संकेत थोबडे नगर, वसंत विहार सोलापूर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रविराज मोरे आणि त्यांच्या घरात राहणारी महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार कसबे यांच्याकडे सोपविण्यात आलाय.