बाजारपेठेचं प्रमुख ठिकाण अशी ओळख असलेल्या परिसरात अवैध बांधकामांना ऊत

shivrajya patra

धामोरी : कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील बाजारपेठेचं प्रमुख ठिकाण अशी ओळख असलेल्या परिसरात अवैध बांधकामांना ऊत आल्याचं दिसतंय. इथलं कोणतंही नवं बांधकाम, बांधकाम विभाग अथवा सिटी सर्व्हेकडील प्रॉपर्टी मोजमापाप्रमाणे होताना दिसत नाही. त्यामुळे अशा बांधकामांना त्यांचं 'अभय' आहे काय, असा सवाल सामान्यांतून व्यक्त केला जात आहे.

धामोरी गावात काही वर्षापूर्वी गावातील उत्सवाकाळात विविध भागात रथ-ट्रॅक्टर मिरवणुका निघत असत, त्या आजही निघत आहेत. पूर्वी मिरवणूकप्रसंगी रहदारीसाठी अडथळे येत नव्हते, आता बांधकाम अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीन-तेरा झाल्याचा कटु अनुभव ग्रामस्थांना येत आहे.

या अतिक्रमण बांधकाम करणाऱ्यांची सिटी सर्व्हे अधिकाऱ्यांशी काही 'मिलिभगत' तर नाही ना, अशी रसभरीत चर्चा धामोरी येथील काही भागात राहणाऱ्या नागरिकांमधून सुरू आहे.

गांव पातळीवर होत असलेल्या अतिक्रमीत बांधकामांकडे कानाडोळा झाला, तर येत्या काळात रस्ते शिल्लक राहण्याची आशा मावळणार आहे. सिटी सर्व्हे अधिकाऱ्यांकडून अतिक्रमण विरोधी मोहिम राबवण्यात यावी. याकडे संबंधित बांधकाम विभाग अधिकारी , सिटी सर्वे अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरीत आहे.

To Top