सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलबार हिल येथील 'मुक्तागिरी' शासकीय निवासस्थानी पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख सौ. सुदर्शना रमेश त्रिगुणाईत, सोलापूर लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख महेशनाना साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरातील एमआयएम पक्षापासून दूरावलेल्या अल्पसंख्य समाजातील धडाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला.
शुक्रवारी रात्री मुंबईत शासकीय निवासस्थानी, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी, शिवसेनेत प्रवेशोत्सुक कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यांचं शिवसेना चा केशरी शेला घालून या सर्वांचं शिवसेनेत स्वागत केलं.
त्यात ए आय एम आय एम पक्षाचे पूर्वाश्रमीचे पदाधिकारी सुहेल शेख, मोईन शेख अन् त्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करीत असलेले मुजफ्फर शेख, फरहान पटेल, आदिल पटेल, शाहरुख शेख, लुईस कोरे, अबरार शेख, आकिब सय्यद, आवेज सय्यद, मोहसीन शेख, रियाज नदाफ, अभी मेसे, नदीम नदाफ आणि पत्रकार सलाऊद्दीन शेख यांचा समावेश होता.
राज्यात येत्या काळात स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. पावसाळा संपण्यापूर्वीच ही 'रण' धुमाळी रंगणार आहे. शिंदे सेनेत नव्यानं पक्ष प्रवेश केलेले सर्व 'चेहरे' सोलापुरातील पूर्व विभाग आणि मध्य भागातील असून बहुसंख्येने अल्पसंख्य समाजातून पुढं आलेले आहेत.
या सर्वांचं पक्षांतर, त्यांच्या समाजाकडं हक्काची 'मत बँक ' म्हणून पाहणाऱ्या परंपरागत पक्षाच्या ताकदीवर विपरित परिणाम करणारा ठरणार आहे. शहरात आजवर अल्पसंख्य समाजातून इतक्या मोठ्या संख्येने शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेणारी तरुणाई पुढं आलेली नव्हती, या सर्व ' नव्या ' चेहऱ्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेश पर्यायाने पूर्व आणि मध्य भागात शिंदे सेनेला बळ देणारा असल्याचे संकेत मानले जात आहेत.