११,५८,२२५ रूपयांची फसवणूक करण्याचं 'शौर्य';यात्रा कंपनीच्या 'वाघ' सह चौघांविरुध्द गुन्हा दाखल

shivrajya patra

सोलापूर : चारधाम यात्रा करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. ते सत्यात उतरवायचं तर यात्रा कंपनीकडं जाणं आलंच. चार धाम यात्रेचं स्वप्न उराशी बाळगून यात्रा कंपनीकडं गेलेल्या पर्यटकांचा स्वप्नभंग झाला. त्यांना फसविण्याचं 'शौर्य' दाखविलेल्या यात्रा कंपनीनं या पर्यटकांची ११,५८,२२५ रूपयांची आर्थिक फसवणूक केलीय. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मयुरेश नामदेव वाघ यांच्यासह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अवघ्या पुणे-नाशिक इथं कार्यालयं असलेल्या ' शौर्य ' यात्रा कंपनी जवळपास ०३ दशकांपासून देशभरात दर्शनासाठी निघणाऱ्या भाविक-भक्त आणि पर्यटकांना सफरीवर घेऊन निघते.

' शौर्य ' यात्रा कंपनीनं सोलापुरात लक्ष्मी मार्केट इथं नव्यानं कार्यालय थाटून देशभ्रमण सफरी सुरु केल्या. किरण सुरेश शेळगे, (वय-३४ वर्षे, रा-डी-२२ महेश थोबडे नगर, शेळगी.) आणि इतरांनी शौर्य यात्रा कंपनीकडे चारधाम यात्रा करीता नियोजन केले होते.

त्यांच्या नियोजनानुसार 12 जानेवारी 2025 पासून 'शौर्य' यात्रा कंपनीकडे वेळोवेळी ऑनलाइन व रोख स्वरूपात ११,५८,२२५ रूपयांचा भरणा केला. त्यानंतर त्यांना यात्रा कंपनीचे मालक मयुरेश नामदेव वाघ आणि लक्ष्मी मार्केट येथील कार्यालयातील कर्मचारी खोटे आश्वासन देत चारधाम आणि उत्तर भारत यात्रा रद्द केली, मात्र घेतलेले पैसे परत न करता त्या सर्वांची फसवणूक केली.

यासंदर्भात किरण शेळगे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार कंपनीचे मालक मयुरेश नामदेव वाघ, अश्विनी स्वामी, शामकुमार मराठे आणि काजल निमसे (रा. माहित नाही) यांच्याविरुद्ध ११,५८,२२५ रूपयांच्या फसवणूक प्रकरणी सोमवारी रात्री भा. न्याय संहिता कलम ३१८ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

To Top