सोलापूर : मस्जिदच्या नावाने देणग्या गोळा करून देणगीदारांची फसवणूक करण्याबरोबर ती रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर वळवून अपहार केलेल्या रियाज अहमद जमीर कुमठे याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला. हा प्रकार 31 मार्च ते आजमितीपर्यंत घडला. याप्रकरणी सोलापूर शहर एटीएसमध्ये नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, येथील विडी घरकुल परिसर लक्ष्मी चौक येथे तक्या अरबी मदरसा व मशिदसाठी रियाज अहमद जमीर कुमठे (रा-१३५५, जी ग्रुप विडी घरकुल, हैद्राबाद रोड, सोलापूर) याने देणगी गोळा करत असल्याचे भासवून देणगीदारांची फसवणूक केली.
रियाज कुमठे स्वतः मदरसाचा उपाध्यक्ष असूनसुध्दा विश्वस्ताच्या कर्तव्याचे उल्लंघन करून देणगी स्वतःच्या नावावर बँक खात्यावर वळवून अपहार आणि देणगीदाराची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर शहर दहशतवाद विरोधी पथकातील चे नितीन दत्तात्रय जावळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यानुसार रियाज कुमठे याच्याविरुद्ध भा. न्याय संहिता कलम ३१४,३१६,३१८ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
