सोलापूर : सुमारे ०३ वर्षापूर्वी विक्री केलेला फ्लॅट पुन्हा विक्री करुन ३२,५०,००० रुपयांची फसवणूक करण्यात आलीय. ही घटना विजापूर रस्त्यावरील हल्ली बहुचर्चेत असलेल्या पनाश लाईफ स्टाईल होम्स मध्ये घडलीय. या प्रकरणी ठकसेन अमित थेपडे (रा. सोलापूर) याच्याविरूध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, विजापूर रस्त्यावरील गॅलोर डेव्हलपर्स प्रा. लि. अंतर्गत पनाश लाईफ स्टाईल होम्स, ए १ बिल्डींगमधील फ्लॅट नं. १२०१ हा फ्लॅट २९ ऑगस्ट २०२२ अन्वये हार्दीक शहा यांना विक्री करण्यात आला. तोच फ्लॅट अक्कलकोट शहरातील बुधवार पेठेत राहणारे महेश पंचप्पा कापसे यांना विक्रीसाठी दाखविण्यात आला.
तो फ्लॅट खरेदी करण्यासाठी महेश कापसे यांनी ३० डिसेंबर २०२२ रोजी अमित थेपडे याला आरटीजीएस पद्धतीने ३२,५०,००० रुपये दिले. त्या घडीपासून कापसे यांना फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. फ्लॅट खरेदीत आपली लाखो रुपयांची फसवणूक झाली असल्याचे स्पष्ट झाल्यावर महेश कापसे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यानुसार अमित थेपडे याच्याविरुद्ध शुक्रवारी, भा.द.वि. कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.